संवाद हरवल्याने आज अनेक प्रश्न निर्माण झालेत मुग्धा चिटणीस-घोडके हिच्या 22व्या स्मृतीदिन सोहळ्यात दिला संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:38 PM2018-05-07T15:38:07+5:302018-05-07T15:38:07+5:30
मुग्धा चिटणीस - घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान, ठाणे व व्यास क्रिएशन्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कथाकथनकार मुग्धा चिटणीस - घोडके हिच्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
ठाणे : शब्दशक्ती प्रचंड आहे. संवाद हरवल्याने आज अनेक प्रश्न निर्माण झालेत.त्यामुळे जीवनामधला संवाद कायम ठेवा. म्हणजे आयुष्य आनंदी होईल. असा प्रेरक संदेश यंदाच्या मुग्धा चिटणीस-घोडके हिच्या 22व्या स्मृतीदिन सोहळ्याने उपस्थितांना दिला. शिक्षण भरपूर घ्या, नोकरी न करता व्यवसाय करा, वाचन भरपूर करा आणि सन्मार्गानेच यशस्विता मिळते हे लक्षात ठेवा हा सुखी जीवनाचा मूलमंत्र असल्याचे मनोहर जोशी यांनी यावेळी सांगितले.
व्यास क्रिएशन्स् आणि पितांबरी प्रॉडक्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा झालेला हा स्मृतिदिन उपस्थित रसिकांना आनंदाबरोबरच एक ‘विचार’ देऊन गेला. व्यास क्रिएशन्स् प्रकाशित प्रा. अशोक चिटणीस लिखित जगावेगळ्या (चौथी आवृत्ती) आणि यशस्वी उद्योजकांच्या प्रेरक कथा शिवाय अशोक व शुभा दाम्पत्य लिखित संवाद संवादकांशी (चौथी आवृत्ती) या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याने सहयोग मंदिरमधील रविवारची संध्याकाळ प्रकाशमान व प्रसन्न झाली. नवचैतन्य प्रकाशन आणि व्यास क्रिएशन्स् यांनी ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. डॉ. मनोहर जोशी (शिवसेना नेते), प्रा. अरुण गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष), पितांबरीचे रवीन्द्र प्रभुदेसाई, ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि नामवंत वक्त्या धनश्री लेले या पाचही विशेष अतिथींनी ठाणेकर रसिकांशी हृदयसंवाद साधून कार्यक्रमाला रंगत आणली. अशोक चिटणीस व शुभा चिटणीस हे दाम्पत्य अद्भूत रसायन असून स्वतःचे दुःख विसरून पुस्तक प्रकाशनांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे शिक्कामोर्तब त्यांनी याप्रसंगी केले. ठाणे हे रसिकांचे व गुणवंतांचे असल्याचा निर्वाळा आ. संजय केळकर यांनी दिला. प्रत्येक पुस्तक हे प्रकाश देते, म्हणून पुस्तकांच्या प्रसिद्ध होण्याला प्रकाशन सोहळा म्हणतात हा विचार धनश्री लेले यांनी देऊन चिटणीस दाम्पत्याची पुस्तके हीच एक कार्यशाळा असल्याचे कौतुक केले. रवीन्द्र प्रभुदेसाई यांनी मोठी स्वप्ने बघण्याचे आवाहन करून मराठी माणसांनी उद्योग करण्याला प्राधन्य द्यावे असे सांगितले तर प्रा. अरुण गुजराथी यांनी सांगितले की, ‘‘कागदावर लिहिणारे भरपूर लेखक आहेत. पण काळजावर लिहिणारे चिटणीस दाम्पत्यासारखे विरळेच म्हणावे लागतील. संवाद संपला म्हणून अनेक प्रश्न निर्माण झालेत. वाचनाबरोबरच चिंतन वाढले तर संवाद सुरू होऊन जीवन आनंदी बनेल.’’