शिवभोजन योजनेला सुरुवात, सात केंद्रांवर आजपासून १० रुपयांची थाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 03:03 AM2020-01-26T03:03:23+5:302020-01-26T03:03:40+5:30
शासन निर्णयानुसार गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे.
ठाणे : शिवभोजन योजनेला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारपासून सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यात सात केंद्रांवर ही योजना कार्यान्वित होणार असून याठिकाणी दररोज ६७५ थाळ्यांचे प्रायोगिक तत्त्वावर वाटप केले जाणार आहे. या थाळीचा स्वाद घेणाऱ्यांचा एक फोटो क्लिक केला जाणार असून मोबाइल नंबर घेऊन त्यावर ‘स्वाद चाखल्याबद्दल धन्यवाद,’ असा एसएमएसही पाठवण्यात येणार आहे. ठाण्यातील एका केंद्रावर या योजनेचा पालकमंत्र्यांच्या तर इतर केंद्रांवर तेथील आमदारांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार असल्याने योजनेचा जास्तीतजास्त गरीब व गरजू लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शासन निर्णयानुसार गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्याला एक हजार ३५० थाळ्यांचे टार्गेट आहे. योजनेत महिला किंवा महिला बचत गटांंना प्रामुख्याने हे काम दिले जाणार आहे. ज्या ठिकाणी हे केंद्र उभे राहणार आहे, त्याठिकाणाचे शिधावाटप विभाग, महापालिका आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली असून तेथेच केंद्र सुरू होणार आहे. जागा व शासनाच्या नियमावलीनुसार व्यवस्था आहे की नाही, याची तपासणी केली. त्यानंतर केंद्रांची निवड केली गेली आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यात सात केंद्रे सुरू होत आहे. यामध्ये भिवंडीत-२, नवी मुंबई, भार्इंदर, कळवा येथे प्रत्येकी एका आणि ठाणे शहरात दोन ठिकाणांचा समावेश आहे. यातील लोकमान्य, पाडा नंबर-२ येथे पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या केंद्रांवर वरण-भात, पोळी-भाजी, असे पदार्थ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे. सध्या हे केंद्र प्रायोगिक तत्त्वावर असून तेथील गर्दी पाहून तेथील थाळी कमी करायची किंवा वाढवायची, याचा निर्णय होणार आहे. एका केंद्रावर जास्तीतजास्त १५० आणि कमीतकमी ७५ थाळ्यांचे वाटप होणार आहे.
तेराशे थाळ्यांचे जिल्ह्याला टार्गेट असल्याने त्याच्यासाठी १३ केंदे्र जिल्ह्यात उभी राहण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीस सात केंदे्र सुरू होत आहेत. उर्वरित केंदे्र लवकरच सुरू होतील. या केंद्रांवर थाळीचा स्वाद घेणाऱ्यांची नोंद करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामध्ये फोटो आणि मोबाइल नंबर घेतला जाणार असून त्याद्वारे थाळ्यांची माहिती जमा केली जाणार आहे. - नरेश वंजारी,
उपनियंत्रक शिधावाटप, ‘फ’ परिमंडळ, ठाणे