ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ ‘गर्डर’साठी आज विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:39 AM2017-08-20T03:39:54+5:302017-08-20T03:40:02+5:30
ठाकुर्ली स्थानकाजवळील रेल्वे क्रॉसिंगचे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे.
मुंबई : ठाकुर्ली स्थानकाजवळील रेल्वे क्रॉसिंगचे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकदरम्यान पुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने रविवारी सकाळी ९.१५ ते दुपारी १२.४५पर्यंत कल्याण- डोंबिवली स्थानकांदरम्यान एकही लोकल गाडी धावणार नाही.
ठाकुर्ली स्थानकाजवळील पुलाचे चार गर्डर टाकण्याचे काम रविवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन धिम्या, अप आणि डाऊन जलद आणि पाचव्या, सहाव्या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.३६ मिनिटांनी ते सकाळी ११.३४ मिनिटांनी कसारा, आसनगाव, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर कर्जतकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, या स्थानकांकडून सीएसएमटीकडे गाड्या सकाळी ८.३० ते १२.२२पर्यंत बंद राहतील.
रद्द एक्स्प्रेस : या ब्लॉकमुळे एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. रविवारी मुंबईकडे येणाºया पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर ट्रेन क्रमांक १२१४० नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस रविवारी नाशिक रोडपर्यंत चालविण्यात येणार आहे.
कर्जत-पनवेल- दिवा मार्गे एक्स्प्रेस
पुणे येथून मुंबईच्या दिशेने येणाºया अप मेल एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा मार्गे चालवण्यात येणार आहेत. कल्याण स्थानकावरील उतरण्यासाठी या मेल-एक्स्प्रेसला दिवा स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे. परिणामी, या एक्स्प्रेस १० ते ४० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानी पोहोचणार आहेत.
उशिरा धावणा-या एक्स्प्रेस
ब्लॉक कालावधीत काहीअंशी मेल-एक्स्प्रेस ट्रेन कल्याण स्थानकात अनिश्चित काळासाठी थांबविण्यात येतील. परिणामी, या मेल, एक्स्प्रेस आपल्या गंतव्य स्थानी विलंबाने पोहोचणे अपेक्षित आहे. यात हावडा-मुंबई एक्स्प्रेस, राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेस, वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस, हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, वाराणसी-सीएसटी महानगरी एक्स्प्रेस, अलाहाबाद-एलटीटी दुरान्तो एक्स्प्रेस या ट्रेनचा समावेश आहे. तर, डाऊन मार्गावरील मेल-एक्स्प्रेस ट्रेनला दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. यात सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, सीएसएमटी-नागरकोविल एक्स्प्रेस, एलटीटी-ककीनाडा पोर्ट, सीएसएनटी-हैदराबाद एक्स्प्रेसचा समावेश आहे. तर एलटीटी-गोरखपूर, सीएसटी-हावडा या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.