'आज जत मागत आहेत, उद्या महाराष्ट्र मागतील', आव्हाडांचा सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 07:44 PM2022-11-23T19:44:21+5:302022-11-23T19:46:05+5:30
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे.
मुंबई - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले आहे. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला, त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, आपल्याविरुद्ध कसा कट रचण्यात आला तेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार कर्नाटक करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं आहे. यावरुन, राज्यात वाद निर्माण झाला असून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. आता, जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात मत व्यक्त केलं. ''जत हे त्यांचं नाही, मुंबई स्वतंत्र झाली तेव्हा सर्वच महाराष्ट्र हा आपल्याला मिळाला नव्हता. महाराष्ट्र सीमेवरील काही भाग हे महाराष्ट्राला मिळाले नाहीत. आज ते जत मागत आहेत, उद्या मुंबई मागायला देखील कमी करणार नाहीत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या सरकारने उत्तर द्यायला हवे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले मुख्यमंत्री
२०१२ ला कर्नाटकात जत तालुक्यात ही गाव यावीत ही मागणी होती. जत तालुक्यातील पाण्यासाठी राज्य सरकारचे काम सुरू आहे. सामोपचाराने हा विषय सोडवला पाहिजे, यासाठी आम्ही बैठका घेतल्या आहेत. जत तालुक्यातील लोकांसाठी आम्ही योजनेत सुधारणा केल्या आहेत. महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जत तालुक्यातील कोणतीही गावं पाण्यासाठी बाहेर जाणार नाहीत, याची काळजी सरकार घेईल. या प्रकरणाचा जुना वाद न्यायालयात आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. जतमधील गावांचा ठराव हा २०१२ मधील होता. आता कोणताही नवीन ठराव केलेला नाही. हे शत्रुत्व नाही, कायदेशीर लढाई आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच एकही गाव महाराष्ट्रातून कुठेही जाणार नाही. उलट सीमाभागातील गावं आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.