आज ठरणार : बालेकिल्ला कोणाचा

By admin | Published: November 2, 2015 01:55 AM2015-11-02T01:55:50+5:302015-11-02T01:55:50+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेकांपासून फारकत घेतलेल्या भाजप-शिवसेनेसह आघाडी आणि मनसे, बविआ, रासप, बसपा, एमआयएम, अपक्ष आदींच्या उमेदवाराचे भवितव्य ठरविणारे मतदान रविवारी पार पडले

Today will decide: Whome is the cottage? | आज ठरणार : बालेकिल्ला कोणाचा

आज ठरणार : बालेकिल्ला कोणाचा

Next

अनिकेत घमंडी, डोंबिवली
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेकांपासून फारकत घेतलेल्या भाजप-शिवसेनेसह आघाडी आणि मनसे, बविआ, रासप, बसपा, एमआयएम, अपक्ष आदींच्या उमेदवाराचे भवितव्य ठरविणारे मतदान रविवारी पार पडले. अपवाद वगळता बहुतांशी ठिकाणी मतदान शांततेच्या वातावरणात पार पडले. प्रचाराच्या शुभारंभापासूनच आरोप - प्रत्यारोपांसह ‘पंजे’, जबडे काढण्यात आणि शेवटच्या रात्रीत गोळीबारासह तलवारी नाचवण्यापर्यंत मजल गेली. असे असले तरीही खऱ्या अर्थाने ही निवडणूक केवळ भाजप-सेना यांच्यातच लढली गेली. गेल्या काही वर्षातील ‘युती’चा बालेकिल्ला म्हणवला जाणारा हा गड नेमका ‘सेनेचा’, ‘भाजप’चा की अन्य कुणाचा हे देखिल सोमवारच्या निकालात स्पष्ट होईल. तसेच संघ परिवार नेमका कोणाच्या बाजूने उभा राहतो हे वास्तव समोर येणार आहे. सकाळी ९.३० वाजेपासून मतमोजणीस सुरूवात होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने ‘चिकन सूप’-बटाटे वडे काढले तर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘संघाची अर्धी चड्डी’ असा उल्लेख केला होता. त्याचे परिणाम या दोन्ही पक्षांना या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराच्या पराभवाच्या रुपाने भोगावे लागले. विधानसभेतही या दोन्ही पक्षांना या ठिकाणी सपाटून मार खावा लागला. काही ठिकाणी मनसे उमेदवाराचे तर डिपॉझीटही जप्त झाले.
लोकसभेत युतीचा तर विधानसभेत कल्याण ग्रामीण वगळता सर्व ठिकाणी भाजपसह (सहयोगी) अपक्ष आमदार विजयी झाले होते. तेव्हापासूनच केडीएमसीच्या निवडणुकीतही स्वतंत्र लढण्याचा सेना-भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला होता, झालेही तसेच. साधारणत: पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच युतीत दरी निर्माण झाली असून ते स्वतंत्र लढत आहेत. त्यामुळेच संपूर्ण प्रचार हा केवळ या दोन पक्षांभोवतीच झाला. ११७ प्रभागांमधून एकूण ७८९ उमेदवार उभे असून या निवडणुकीत भाजपने दाखवलेले स्मार्ट सिटीचे स्वप्न, शिवसेनेची वचनपूर्ती, तर मनसेच्या नाशिक पॅटर्नपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा नवी मुंबई पॅटर्न आणि काँग्रेसचा जाहिरनामा हा फिका पडल्याचे दिसून आले. सुरुवातीला केवळ विकासाच्या मुद्याभोवती फिरणाऱ्या प्रचारात नंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा डागण्यात आल्या, त्यानंतर दोन्ही पक्षांचे वाद विकोपाला गेले आणि थेट पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
‘संघ- परिवार’, ब्राह्मण मते, जातीय समीकरणे, नेत्यांचे वैयक्तिक वाद, पक्षांतर्गत धुसफूस ही देखिल या निमित्ताने चव्हाट्यावर आली. मुख्यमंत्र्यांची संघ स्वयंसेवक-पदाधिकाऱ्यांसोबतची स्वतंत्र बैठक, प्रचाराच्या शेवटच्या घटकेपर्यंत येथे येणे, मार्गदर्शन करणे, शिवसनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचेही येथे ठाण मांडणे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्री पदाच्या राजीनाम्याचे नाट्य, शुक्रवारच्या मध्यरात्रीतील जीवघेण्या मारामाऱ्या, हल्ले, जमाव बंदी धाब्यावर बसवणे, पक्षश्रेष्ठींचे महापालिका क्षेत्रात मुक्त संचार या सर्व घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यात प्रचंड चर्चेची ठरली.
स्थानिक समस्यांची चर्चा करतांना, राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे चर्चेला गेल्याने नागरिकांच्या पचनी फारसा हा प्रचार पडला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांना एकेरी शब्दांत बोलणे, त्याचा त्यांनीही भर सभेत समाचार घेणे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीकास्त्र, त्यांच्या परदेश दौऱ्यांची टिंगल, महागाईवर टीका, अच्छे दिनवर टीका, याखेरीज २० वर्षे होऊनही सत्ताधाऱ्यांनी या शहरांना काही न देता कसे बकाल केले या मुद्यांवरच भर देत प्रचार रंगला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यासह शुक्रवार - शनिवारमध्ये एकमेकांना थेट आव्हाने देण्यासह, हाणामाऱ्या, बंदुका काढण्यापर्यंत उमेदवारांची मजल गेली. त्यामुळे सोमवारचा निवडणूक निकाल हा खऱ्या अर्थाने स्थानिक उमेदवारांसह या दोन्ही पक्षांमध्ये ‘शक्ती परीक्षा’च असणार आहे.

Web Title: Today will decide: Whome is the cottage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.