‘बंडोबा’ गाजवणार आजचा दिवस
By admin | Published: February 3, 2017 03:29 AM2017-02-03T03:29:56+5:302017-02-03T03:29:56+5:30
पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या, (शुक्रवार) अखेरचा दिवस असल्याने बंडखोरांची पळापळ वेगात सुरू आहे. काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नारायण
ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या, (शुक्रवार) अखेरचा दिवस असल्याने बंडखोरांची पळापळ वेगात सुरू आहे. काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नारायण पवार यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला, तर चार महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले माजी नगरसेवक संजय घाडीगावकर आणि नगरसेविका स्वाती देशमुख यांनी अचानक भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष लढण्याचा निर्धार केला. लागलीच त्यांना लाल गालिचे अंथरण्यास मनसे सज्ज झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपते आहे. मात्र, अजून कुठल्याही पक्षाने उमेदवारांच्या अधिकृत याद्या जाहीर केलेल्या नाहीत. व्हॉट्सअॅपवर दिवसभर वेगवेगळ्या पक्षांच्या याद्या फिरत होत्या. मात्र, त्याला ना कुणी दुजोरा दिला, ना त्या नाकारल्या. अर्थात, कुणाचा पत्ता कापला आणि कुणाचे नशीब फुलले, या चर्चांना ऊत आला आहे. यामुळे बंडखोरीसाठी अनेक जण सज्ज आहेत. त्यातच, सावधगिरीचा उपाय म्हणून सर्वच पक्षांनी सर्वच इच्छुकांना आॅनलाइन अर्ज दाखल करण्यास सांगितल्याने अनेकांचे अर्ज दाखल आहेत. त्यांना केवळ त्याची प्रिंट काढून आयोगाला सादर करायची आहे. समजा, पक्षाचा ‘ए-बी’ फॉर्म मिळाला नाही, तर अपक्ष किंवा अन्य पक्षांकडून लढण्यास अनेक जण तयार आहेत. या पार्श्वभूमीवर अलीकडेच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या घाडीगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना भाजपाचे स्थानिक नेते राजकीय व आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे नारायण पवार भाजपात प्रवेश करणार, अशी चर्चा दीर्घकाळ सुरू होती. त्यांनी गुरुवारी प्रवेश केला. भाजपाच्या फुटलेल्या यादीत कळव्याचे उमेश पाटील यांचे नाव आहे. मात्र, ते शिवसेनेत आहेत. (प्रतिनिधी)