केडीएमसीतून निवृत्त २४ शिक्षकांच्या वेतनाचा आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 03:02 AM2017-08-16T03:02:01+5:302017-08-16T03:02:04+5:30
‘एमएस-सीआयटी’ परीक्षा वेळेत उत्तीर्ण न झाल्याने सध्या निवृत्ती वेतनासाठी केडीएमसीतील २४ निवृत्त कर्मचाºयांची फरफट सुरू आहे.
कल्याण : ‘एमएस-सीआयटी’ परीक्षा वेळेत उत्तीर्ण न झाल्याने सध्या निवृत्ती वेतनासाठी केडीएमसीतील २४ निवृत्त कर्मचाºयांची फरफट सुरू आहे. यातील शिक्षकांना ‘एमएस-सीआयटी’ची असलेली अट माफ करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीनंतर आता बुधवारच्या महासभेत ठेवण्यात आला आहे. ही अट रद्द करण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे महासभा, यावर कोणता निर्णय घेते? याकडे लक्ष लागले आहे.
निवृत्त शिक्षकांना दिलेली वेतनवाढीची रक्कम वसूल करून त्यांचे निवृत्ती वेतन सुरू करा, असे आदेश सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी शिक्षण समितीच्या सभेत प्रशासनाला दिले होते. विहीत वयोमानानुसार निवृत्त झालेल्या शिक्षकांनाही ‘एमएस-सीआयटी’ संगणक प्रशिक्षण उत्तीर्ण होण्याची अट बंधनकारक आहे. मात्र यामुळे बहुतांश शिक्षकांचे निवृत्ती वेतन रखडल्याने ही अट रद्द करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. त्याअनुषंगाने ही अट ३० जून २०१७ अखेर निवृत्त झालेल्या १९ शिक्षकांना क्षमापित करावी, असा प्रस्ताव सभापती घोलप यांनी शिक्षण समितीच्या सभेत मांडला होता. परंतु, प्रशासनाने अट रद्द करण्यास नकार दिला. सरकारच्या अध्यादेशानुसार ही परीक्षा बंधनकारक आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण न घेतलेल्या शिक्षकांकडून वेतनवाढीची रक्कम वसूल करावी, असे आदेश दिल्याची माहिती उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी त्या वेळी सदस्यांना दिली. प्रशासनाची नकारघंटा पाहता यावर वेतनवाढीची रक्कम वसूल करून शिक्षकांचे निवृत्ती वेतन सुरू करा, असे आदेश सभापती घोलप यांना अखेर द्यावे लागले.
आता हा प्रस्ताव महासभेकडे आला आहे. घोलप यांनीच तो मांडला आहे. त्या सूचक असून, अनुमोदन नगरसेविका शालीनी वायले यांचे लाभले आहे. एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने शिक्षकांची वेतनासाठी सुरू असलेली फरफट पाहता महासभा त्यांना न्याय देते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वर्ग १ ते वर्ग ३ मधील अधिकारी आणि कर्मचाºयांसाठी ‘एमएस-सीआयटी’चे प्रशिक्षण बंधनकारक आहे. हे प्रशिक्षण डिसेंबर २००७ पर्यंत करणे आवश्यक होते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कर्मचाºयांना सरकारने दोनदा मुदतवाढ दिली. ‘एमएस-सीआयटी’ परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास संबंधितांना वेतनवाढ तसेच निवृत्तीवेतन मिळणार नाही, असा आदेश काढला होता. केडीएमसीत ५७२ जणही परीक्षा अद्याप उत्तीर्ण झालेले नाहीत.