वसई-विरार पालिकेवर आज मोर्चा
By admin | Published: February 6, 2016 02:04 AM2016-02-06T02:04:32+5:302016-02-06T02:04:32+5:30
वसई-विरार महानगरपालिकेतील सफाई कामगारांना कायद्याने देय असलेले किमान वेतन तत्काळ देण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक
विरार : वसई-विरार महानगरपालिकेतील सफाई कामगारांना कायद्याने देय असलेले किमान वेतन तत्काळ देण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली उद्या दि.६ फेब्रुवारी २०१६ रोजी इशारा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे सरचिटणीस पुतवाजी कदम यांनी दिली आहे. तरी, सफाई कामगारांनी वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयावरील इशारा मोर्चात सहभागी होऊन महापालिकेला बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यासाठी दुपारी काम संपल्यानंतर विरार येथे उपस्थित राहावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसूचनेनुसार वसई-विरार महापालिकेतील सफाई कामगारांना सुधारित किमान वेतन मिळणे अपेक्षित असताना कामगारांना अद्याप ते मिळालेले नाही. कामगारांना किमान वेतन मिळावे, यासाठी संघटनेने १८ नोव्हेंबर २०१५ रोजी महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात आंदोलन केले होते.
त्या वेळी पालिका प्रशासनाने कामगार संघटनेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप केली नाही म्हणून इशारा मोर्चा आयोजण्यात आला आहे. या मागणीसंदर्भात २९ जानेवारी २०१६ रोजी महापालिकेला पत्र देऊन किमान वेतनाची मागणी केली होती. (प्रतिनिधी)