‘बुद्धांच्या विचारांची आज गरज’
By admin | Published: May 11, 2017 01:50 AM2017-05-11T01:50:44+5:302017-05-11T01:50:44+5:30
भगवान बुद्धांनी जगाला पंचशील दिले आहे. या देशात त्याचे पालन केल्यास पोलिसांचीही गरज भासणार नाही. ‘अत्तदीप भव,’ असा विचारही त्यांनी दिला. ‘
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : भगवान बुद्धांनी जगाला पंचशील दिले आहे. या देशात त्याचे पालन केल्यास पोलिसांचीही गरज भासणार नाही. ‘अत्तदीप भव,’ असा विचारही त्यांनी दिला. ‘अत्तदीप भव’ म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. आजच्या समाजाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे, असे मत प्रा. शुकाचार्य गायकवाड यांनी व्यक्त केले.
‘ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्थे’तर्फे बुद्धपौर्णिमेनिमित्त गौतम बुद्ध यांच्यावर आधारित व्याख्यान कानविंदे व्यायामशाळेत झाले. याप्रसंगी गायकवाड बोलत होते. या वेळी भानुदास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते के. एस. सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, जगात दु:ख आहे. दु:खाला कारण आहे. तसेच त्यावर उपायही आहे. बुद्धांनी दु:खावर उपाय अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. बुद्धाचा धम्म हा मानवतावादी, विज्ञानवादी आहे. श्रीलंका, म्यानमार, थायलंड येथील अनुभवही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता आगाशे यांनी केले. भानुदास चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.