शौचालयाचा उल्लेखही शपथपत्रात हवा
By admin | Published: January 28, 2017 02:45 AM2017-01-28T02:45:06+5:302017-01-28T02:45:06+5:30
ठाणे महापालिका निवडणुकीत आता महापालिकेच्या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. हा अर्ज भरतानाच
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत आता महापालिकेच्या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. हा अर्ज भरतानाच देण्यात येणाऱ्या शपथपत्रात शौचालयाचा वापर करता किंवा नाही, याचाही उल्लेख करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी या संदर्भातील ना हरकत दाखला मिळविण्यासाठी पालिकेच्या प्रभाग समित्यांकडे आगेकुच सुरु केली आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून हर घर मे शौचालयचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. उघड्यावर शौचास बसू नये, असा त्या मागचा उद्देश आहे. त्यानुसार महापालिकेनेदेखील हगणदारी मुक्त ठाणे करण्यासाठी शौचालय उभारण्याची कामे सुरु केली आहेत. परंतु, शासनाने आता प्रत्येक घरात शौचालय असावे या उद्देशाने निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांकडे शौचालय आहे किंवा नाही, याची माहिती निवडणुकीचा अर्ज भरतांनाच गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. त्यानुसार जो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल त्याच्या घरात शौचालय आहे किंवा नाही, अथवा तो सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो की नाही, याची माहिती त्याला द्यावी लागणार आहे. जर तो वैयक्तीक शौचालयाचा वापर करीत असेल तर त्याची पाहणी संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्याला ना हरकत दाखला मिळेल. त्यानंतर याचा उल्लेख त्याला शपथपत्रातही करावा लागणार आहे. एकूणच निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून शौचालयाचा वापर होत असेल तर त्याचा प्रभागही तो हगणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल, हा कदाचित या मागचा उद्देश असावा. (प्रतिनिधी)