भिवंडी-शीळ मार्गावर टोल, सहापदरी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:43 AM2017-11-30T06:43:51+5:302017-11-30T06:43:56+5:30
भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे. त्यासाठी १.७५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. ती संपादित झाली की प्रकल्पाच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. या कामावर सुमारे ३९० कोटी खर्च होणार असून तो वसूल करण्यासाठी या रस्त्यावर २०३६ सालापर्यंत टोल द्यावा लागणार आहे. राज्यातील सर्व टोल बंद करण्याची घोषमा करणाºया भाजपा-शिवसेना सरकारनेच या नव्या टोलचा प्रस्ताव मांडला आहे, हे याचे वैशिष्ट्य आहे.
भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, कल्याण-निर्मल-नांदेड या महामार्गांना जोडणारा आहे. पायाभूत सुविधांतर्गत सरकारने २००६ साली या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने खाजगी कंत्राटदाराकडून तो विकसित केला. ते काम २००९ ला पूर्ण झाले. भिवंडी-कल्याण-शीळ प्लस या कंपनीला त्याच्या टोलवसुलीचे काम देण्यात आले. त्या कंपनीने २००९ पासून २०१३ पर्यंत टोलवसुली केली. आताही तेथे अवजड वाहनांकडून काटई आणि कोन येथे टोलवसुली सुरु आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच टोलवसुली झाल्याने हे प्रकरण उच्च न्यायालायात गेले होते. ही टोलवसुली बंद करण्यासाठी २००९ साली आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपोषण केले होते.
वाढती वाहतूक लक्षात घेता तो सहा पदरी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा रस्ता २१ किमीचा आहे. त्याच्या सहापदरीकरणावर ३८९ कोटी ६३ लाखाचा खर्च होणार आहे. त्यासाठी २०१७-१८ मध्ये ४५ कोटी, २०१८-१९ मध्ये ६० कोटी, २०१९-२० मध्ये ४५ कोटीची रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०१४ सालच्या टोलवसुली धोरणातून या प्रकल्पाला सूट देत २०१६ पर्यंत या रस्त्यावर टोलवसुली होणार आहे.
रस्त्यासाठी भूसंपादन झाले की, निविदा काढली जाईल. ती मंजूर झाल्यावर कार्यादेश देत तीन वर्षात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तीन वर्षाचा बांधकाम कालावधी पाहता रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या पाच टक्के खर्चासाठी नऊ कोटी ८१ लाख बांधकामाच्या किंमतीत समाविष्ट केले आहेत. प्रकल्पात बाधित होणाºयांच्या पुनर्वसनासाठी नऊ कोटी ८० लाखांची, भूसंपादनासाठी ९० कोटीची आणि टोलनाके उभारणीसाठी २५ कोटीची तरतूद याच खर्चात केली आहे.
या सहापदरीकरणासाठी एक हजार ४० झाडे तोडावी लागणार आहेत. त्यासाठी रस्ते विकास महामंडळाने केडीएमसीकडे परवानगी मागितली आहे. त्यावर पालिकेने हरकती सूचना मागवल्या आहेत. पण निर्णय झालेला नाही.
असा होईल खर्च
सहा पदरीकरणासाठी-
७७ कोटी ७२ लाख
देसाई खाडी पूल- तीन कोटी ३७ लाख
चार लहान पूल- तीन कोटी २७ लाख
लोढा जंक्शन दोन पदरी उड्डाणपूल-
३४ कोटी ३२ लाख
काटई रेल्वे मार्गावर दोन पदरी पूल -
९ कोटी ९ लाख
पत्रीपूल भागात दोन पूल-
४ कोटी ६५ लाख
१८ मोºया - १ कोटी ५४ लाख
जंक्शन सुधारणा- ९ कोटी ८४ लाख
सेवा रस्ते- ३ कोटी ४ लाख
बस शेल्टर- ७८ लाख
सल्लागार खर्च- ३ कोटी ९२ लाख
एजन्सी चार्जेस- ११ कोटी ७७ लाख
रस्ते सुरक्षा खर्च- ४९ लाख
सेवा वाहिन्या हलविण्यासाठी- ४ कोटी १० लाख
पर्यावरण बाबींसाठी- ३ कोटी १६ लाख
देखभाल-दुरुस्तीसाठी - नऊ कोटी ८१ लाख
पुनर्वसनासाठी - नऊ कोटी ८० लाख
भूसंपादन - ९० कोटी
टोलनाके उभारणी - २५ कोटी
चौपदरीकरणाचा दुसरा टप्पा गायब
भिवंडी-कल्याण-शीळ या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यावर २६३ कोटी खर्च झाले. त्याचा दुसरा टप्पा २६८ कोटीचा असेल, असे जाहीर केले होते. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु होती. नंतर दुसºया टप्प्याची फाईल गायब झाली. आता सहा पदरीकरण होणार आहे आणि त्याला शासन निर्णयात पहिला टप्पा असे म्हटले आहे.