टोलमुक्ती आमच्या आंदोलनामुळेच; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:17 PM2024-10-19T14:17:35+5:302024-10-19T14:18:06+5:30
राज ठाकरे हे खासगी कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळची सहकुटुंब चव चाखली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. टोलमुक्ती आंदोलन हे काय घरचे सत्यनारायण होते का?, ती लोकांसाठी केलेली गोष्ट होती. त्यामुळे आता टोलमुक्ती झाल्याने सर्वच खूश आहेत.
ठाणे : टोलमुक्ती ही इतकी वर्षे केलेल्या आंदोलनाचे यश असल्याचे मत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी व्यक्त केले. टोलमुक्तीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर केसेस दाखल होत्या; परंतु आता टोलमुक्ती झाली असल्याने केसेसही मागे घ्यायला हव्यात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे हे खासगी कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळची सहकुटुंब चव चाखली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. टोलमुक्ती आंदोलन हे काय घरचे सत्यनारायण होते का?, ती लोकांसाठी केलेली गोष्ट होती. त्यामुळे आता टोलमुक्ती झाल्याने सर्वच खूश आहेत. त्यामुळे केसेस मागे घेतल्याच पाहिजेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. इतकी वर्षे जी काय टोलधाड पडली होती, त्याला डकैती म्हणता येईल. किती पैसे आले, किती जमा झाले, कोणाकडे आले, काय झाले, कशाचाच कशाला पत्ता नव्हता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दुसरीकडे यावेळी भंडार आळीत झालेल्या विनयभंग प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी राज यांची भेट घेऊन निवेदन दिले; तसेच आरोपीला अटक करावी, अशी मागणी केली. यावेळी अशा प्रकारचे कृत्य करणारा माणूस हा कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याला पंखाखाली घालणे योग्य नसल्याचे मत राज यांनी व्यक्त केले. त्या मुलीचा पुन्हा जबाब घेण्यास मी पोलिसांनी सांगितले असून, तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला अटक करा, अशा सूचनाही पोलिसांना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.