टोल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका; मनसेचे टोल दरवाढी विरोधात उपोषणास सुरुवात
By अजित मांडके | Published: October 5, 2023 04:07 PM2023-10-05T16:07:49+5:302023-10-05T16:08:19+5:30
वाढत्या महागाईमध्ये टोल दरवाढीची भर पडणार असून यामुळे जीवनावश्यक वस्तूमध्येही दरवाढ होत सर्वसामान्य नागरिकांचे बजेटही कोलमडणार आहे.
ठाणे : टोल दरवाढीमुळे बससेवा, वाहूक सेवा, जीवनावाश्यक वस्तूच्या दरात वाढ होण्याची शक्यात असल्यामुळे टोल दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मनसेच्या जनआंदोलनातून टोल दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान गुरूवारी आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात ठाण्यातील आनंदनगर प्रवेशद्वारासमोर मनसेने उपोषणाला सुरूवात केली आहे.
ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर १ ऑक्टोंबर पासून लागू केलेल्या दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ३० सप्टेंबरपासून जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे. या जनआंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आनंदनगर येथे साखळी उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यात मनसेने ठाण्यातील विविध चौकात निदर्शने करून लोकांना टोल दरवाढीच्या बाबत जनजागृती केली होती. तर गुरूवारी तिसऱ्या टप्प्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्र घेण्यात आला आहे.
वाढत्या महागाईमध्ये टोल दरवाढीची भर पडणार असून यामुळे जीवनावश्यक वस्तूमध्येही दरवाढ होत सर्वसामान्य नागरिकांचे बजेटही कोलमडणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनआंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कुठे ना कुठे ठाणेकर नागरिकांच्या टोल दरवाढी विषयाच्या व्यथा लक्षात घेईल, अशी अपेक्षा होती. पण निगरगट्ट शासन टोल दरवाढ रद्द करत नसून एक तारखेपासून टोल दरवाढ लागू करण्यात आली असून याचा निषेध करत मनसेच्या वतीने उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.
या उपोषणामध्ये शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर, निलेश चव्हाण, महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंडेय, उपशहर प्रमुख पुष्कर विचारे,सुशांत सूर्यराव,मनोहर चव्हाण,विश्वजित जाधव, करण खरे आदी मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.