महापालिका, पोलिसांमध्ये टोलवाटोलवीचे नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:20 AM2017-10-05T01:20:12+5:302017-10-05T01:20:28+5:30
शहरातील बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत महापालिका व पोलीस टोलवाटोलवी करत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने पाठवलेली बोगस डॉक्टरांची यादी मिळाली
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत महापालिका व पोलीस टोलवाटोलवी करत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने पाठवलेली बोगस डॉक्टरांची यादी मिळाली नसल्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला असून पालिकेने तक्रार दाखल केल्यावरच बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करू, अशी प्रतिक्रिया विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट यांनी दिली.
उल्हासनगरमधील झोपडपट्टी भागात बोगस डॉक्टरांनी बस्तान मांडले आहे. २७ आॅगस्टला १६ वर्षांच्या सीमरन शर्मा नावाच्या मुलीचा तापाने काही तासांत मृत्यू झाल्याने बोगस डॉक्टरांचा प्रकार समोर आला. यापूर्वी नागरिकांनी बोगस डॉक्टरांबाबत पालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांकडे असंख्य तक्रारी आल्या. मात्र, त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई झालेली नाही, असा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला आहे.
महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. के.आर. खरात यांनी बोगस डॉक्टरांवर १० वर्षांपूर्वी मोहीम उघडली होती. अनेक बोगस डॉक्टरांवर कारवाई केल्याने इतरांनी दवाखाने बंद केले. त्यानंतर, मात्र एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई झाली नाही. रगडे, नगरसेवक गजानन शेळके, सविता तोरणे आदींनी बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली. मात्र, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी केवळ कागदी घोडेच नाचवले. ८ बोगस डॉक्टरांची नावे पोलिसांना दिल्याचे डॉ. रिजवानी यांनी सांगितले. तर, दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी एकत्र येऊन शहरातून कॅण्डल मोर्चाही काढला.
डॉ. रिजवानी यांनी बोगस डॉक्टरांची यादी पोलिसांना पाठवल्याचे सांगितले होते. मग, पोलीस कारवाई का करत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. याबाबत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट यांना कारवाईबाबत विचारले असता, त्यांनी यादी आलीच नसल्याचे स्पष्ट केले. तसेच यादी आल्यानंतरही जोपर्यंत पालिका अधिकारी प्रत्यक्ष तक्रार करत नाही, तोपर्यंत बोगस डॉक्टरांवर कारवाई अथवा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेला आहे. यापूर्वी बोगस डॉक्टरांवर पालिकेनेच कारवाई केली होती. मात्र, डॉ. रिजवानी जाणीवपूर्वक बोगस डॉक्टरांवर कारवाईबाबत टोलवाटोलवी व पाठीशी घालत असल्याचा आरोप नगरसेवक गजानन शेळके, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला आहे. यानंतर, बोगस डॉक्टरांकडून अनुचित घटना घडल्यास पालिका आयुक्तांसह वैद्यकीय अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे रगडे यांनी सांगितले.