दरवाढीमुळे टोमॅटो झाले लालबुंद!
By admin | Published: July 6, 2017 06:18 AM2017-07-06T06:18:07+5:302017-07-06T06:18:07+5:30
पुरेसा पाऊस नसल्याने नव्या भाज्यांची आवद मंदावल्याने ठाणे, डोंबिवलीच्या बाजारपेठांत गेल्या आठवडाभरात भाज्यांचे दर कडाडले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पुरेसा पाऊस नसल्याने नव्या भाज्यांची आवद मंदावल्याने ठाणे, डोंबिवलीच्या बाजारपेठांत गेल्या आठवडाभरात भाज्यांचे दर कडाडले असून त्यातील टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. पंधरवड्यापूर्वी २० ते ३० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर ८० रूपये किलोवर गेले आहेत. टोमॅटोबरोबरच कोथिंबीर, फ्लॉवर, मिरची, वांगी या भाज्याही महागड्या टोपलीत बसल्या आहेत.
गेल्या आठवडाभरात मंडईत येणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी, दर वाढत गेले आहेत. अनेक भाज्या ८० रुपयांच्या पुढेच आहेत. आठवडाभरापूर्वी स्वस्त दरात मिळणारा टोमॅटो अचानक महाग होत गेल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. भाज्यांमधील अविभाज्य घटक म्हणून टोमॅटोकडे पाहिले जाते. परंतु त्यांच्या दराने तोंडचे पाणी पळवल्याची महिलांची भावना आहे.
मिरचीचे दर देखील दुपटीने वाढले आहेत. कोथिंबिरीच्या मोठ्या जुडीने दरातच शतक ओलांडले आहे. फ्लॉवर, वांगीही महाग झाले असून वाटाणा तर अडीचशे रुपये किलोवर पोचला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने भाज्या कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे दर वाढल्याचे भाजी विक्रेते गणेश गायकवाड यांनी सांगितले. हे दर दोन आठवड्यांनी घसरतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. वाढत्या दरामुळे स्वाभाविकपणे खरेदीही घटली आहे. जास्तीत जास्त पाव किलो भाजी खरेदी केली जात असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले.