गेल ऑम्वेट यांचे इंग्रजी साहित्य मराठीत अनुवादित करण्याचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:42 AM2021-09-18T04:42:44+5:302021-09-18T04:42:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : समाजशास्त्रज्ञ व मार्क्स, फुले-आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक डॉ. गेल ऑम्वेट आणि प्रसिद्ध पुरोगामी नाटककार, कथाकार, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : समाजशास्त्रज्ञ व मार्क्स, फुले-आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक डॉ. गेल ऑम्वेट आणि प्रसिद्ध पुरोगामी नाटककार, कथाकार, पत्रकार जयंत पवार यांची अभिवादन सभा कल्याणला नुकतीच पार पडली. या सभेत ऑम्वेट यांचे साहित्य इंग्रजीतून मराठी भाषेत अनुवादित करण्याची अपेक्षा शाहीर संभाजी भगत, श्रमिक मुक्ती दलाच्या रंजना आठवले यांनी व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले सभागृहात सोमवारी पुरोगामी विचारमंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आयटक, नागरी हक्क संघर्ष समिती, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, आदी संघटनांनी या अभिवादन सभेचे आयोजन केल्याचे ॲड. नाना अहिरे यांनी सांगितले.
श्रमिक मुक्ती दलातर्फे शिवराम सुकी यांनी ऑम्वेट यांच्यावर एकनाथ पाटील यांनी लिहिलेल्या ‘गेल ऑम्वेट नावाची झुंजार बाई’ या कवितेचे वाचन केले. रंजना आठवले यांनी ऑम्वेट यांच्या आठवणींना उजाळा दिला. शाहिर संभाजी भगत यांनी जयंत पवार यांच्या कथा व नाटकांविषयी मनोगत व्यक्त करून, ऑम्वेट यांची इंग्रजीतील पुस्तके मराठीत आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
----------------
- यावेळी आयटकचे कॉ. उदय चौधरी, कॉ. सुबोध मोरे, डॉ. भारत पाटणकर या प्रमुख वक्त्यांनी याप्रसंगी ऑम्वेट यांचे सांस्कृतिक चळवळीतील योगदान आणि जयंत पवार यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान, विचारवंत, साहित्यिकांच्या विचारांचा विकास करून समतेच्या वाटेवर पुढची पावले टाकण्याची आपली जबाबदारी मनोगतात अधोरेखित केली.
- श्याम गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात सांस्कृतिक मांडणीतील ऑम्वेट यांचे योगदान, पवार यांचे मातीतले आणि सर्वसामान्य जनतेतले साहित्य, यावर चर्चा करून फॅसिझमच्या वाढत्या आव्हानाला नवीन हत्यार घेऊन लढण्याची गरज असल्याचे सांगितले. देवेंद्र शिंदे आणि सुधीर चित्ते यांनी जयंत पवार यांच्या कथांचे परिणामकारक नाट्य अभिवाचन केले.
-------------------