ठाणे जिल्हाभरातील महसूलच्या ७२१ नायब तहसीलदारसह अव्वल कारकून-लिपीक संपात सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:48 PM2019-08-31T17:48:55+5:302019-08-31T18:00:50+5:30
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वाघचौडे, गव्हाळे यांच्यासह रूषिकेश कुलकर्णी, प्रकाश बनसोडे,गिरीष काळे, प्राची चाचड, विजय सकपाळ, कांचन शिरभाते आणि राजू पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हह्यातील सुमारे ७२१ कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आजचा एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी केल्याचे गव्हाळे यांनी निदर्शनात आणून दिले.
ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय आणि तहसीलदार कार्यालयातील जिल्हाभर कार्यरत असलेले प्रमोटेड नायब तहसीलदार, अव्वल कारकाून, लिपीक, कोतवाल आणि सिपाई आदी जिल्हाभरातील सुमारे ७२१ कर्मचाऱ्यांनी शनिवारी एक दिवसांच्या लाक्षणी संपात सहभाग घेतला. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये रक्तदान करून राज्य शासनाचा निषेध केला,असे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार भास्कर गव्हाळे यांनी लोकमतला सांगितले.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वाघचौडे, गव्हाळे यांच्यासह रूषिकेश कुलकर्णी, प्रकाश बनसोडे,गिरीष काळे, प्राची चाचड, विजय सकपाळ, कांचन शिरभाते आणि राजू पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हह्यातील सुमारे ७२१ कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आजचा एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी केल्याचे गव्हाळे यांनी निदर्शनात आणून दिले. प्रदीर्घ काळापासून मागण्या प्रलंबित आहेत. सदनशीर मार्गाने विविध आंदोलने करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत केला. बुधवारी देखील या सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहीक रजा घेऊन धरणे आंदोलन छेडले आहे.
एक दिवसाचा लाक्षणीक संपाचा इशारा देऊनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आजचा लाक्षणीक संप केला. या दिवशी दिवसभर लेखणी बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान करून राज्य शासनाचा जाहीर निषेध या कर्मचाऱ्यांनी करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतरही राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास. ५ सप्टेंबरपासून सर्व कर्मचारी राज्यस्तरीय बेमुदत संप पुकारण्याच्या तयारीत आहे. तत्पुर्वी आज हा लाक्षणी संप कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन यशस्वी केला. त्यास १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे गव्हाळे यांनी निदर्शनात आणून दिले.
या संपाव्दारे कर्मचाऱ्यांनी राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा दिलेल्या नायब तहसीलदारांना ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला जातो, हा अन्याय त्वरीत दूर करण्यात येऊन ग्रेडपे चार हजार ६०० रूपये करण्यात यावा. लिपिकाचे नाव बदलून महसूल सहाय्यक असे नामकरण करावे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाणे ३३ टक्के ऐवजी २० टक्के करा, अव्वल कारकूनच्या वेतन श्रेणीमधील त्रृटी दूर करा,दांगट समितीनुसार पदे मंजूर करा, इतर विभागांच्या कामांसाठी नव्याने आकृती बंध तयार करा आदी १८ प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसाठी महसूल विभागाच्या या कर्मचाऱ्यांनी आजचा लाक्षणीक संप केला. याकडे राज्य शासनाने वेळीच लक्ष केंद्रीत न केल्यास ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याची तयारी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.