झुंबर, बास्केट झुंबरला तुफान मागणी
By admin | Published: October 16, 2016 03:30 AM2016-10-16T03:30:08+5:302016-10-16T03:30:08+5:30
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने रंगीबेरंगी, आकर्षक कंदिलांनी ठाण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. पारंपरिक इकोफ्रेण्डली कंदिलांची ठाणेकरांची मागणी यंदाही कायम
- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने रंगीबेरंगी, आकर्षक कंदिलांनी ठाण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. पारंपरिक इकोफ्रेण्डली कंदिलांची ठाणेकरांची मागणी यंदाही कायम असून यंदा १० हजारांहून अधिक ठाणेकरांच्या घरांवर पारंपरिक कंदील लागणार आहेत. सार्वजनिक कंदिलांमध्येही पारंपरिक झुंबर, बास्केट झुंबर कंदिलांनाच मागणी आहे.
दसऱ्यानंतर आता सर्वांनाच दिवाळीचे वेध लागले आहेत. अगदी थोडेच दिवस हातात राहिल्याने घरातील साफसफाईला सुरुवात झाली आहे. त्यानंतर, फराळाचा बेत आणि मग कपडे, रांगोळी, कंदील, पणत्या अशी खरेदीला सुरुवात होणार आहे.
सध्या ठाण्याच्या बाजारपेठेत विविध प्रकारांचे रंगीबेरंगी कंदील नजरेत पडत आहेत. प्लास्टिकचे कंदील बाजारात आले असले तरी पर्यावरणस्नेही ठाणेकर पर्यावरणपूरक अशा कंदिलांकडे वळू लागले आहेत. दरवर्षी त्यांच्या मागणीत वाढ होत आहे. पारंपरिक कंदील, पणती, सिलिंडर, मटकी, आइस्क्रीमच्या काड्यांपासून बनवलेले कंदील, हॅण्डमेड पेपरचे कंदील, पतंग, चेंडू, झुंबर, ज्यूटचे कंदील, शंकू असे विविध प्रकारांचे कंदील बाजारात आले आहेत. १०० ते २५० रुपयांदरम्यान या कंदिलांची किंमत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सार्वजनिक कंदिलांमध्ये पारंपरिक झुंबर, बास्केट झुंबर हेच कंदील पाहायला मिळत आहे. पाच ते सात फुटांपर्यंतचे सार्वजनिक कंदील बनवण्यात आले आहेत. दीड हजार रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत हे कंदील उपलब्ध आहेत. पहिल्यांदाच हे कंदील बनवले आहेत. या ३५ कंदिलांचे बुकिंग झाले आहे, असे हस्तकलाकार कैलास देसले यांनी सांगितले.
या वर्षी पारंपरिक कंदील १० हजार, तर सर्व प्रकारांचे कंदील तब्बल ३० हजारांपर्यंत बनवण्यात आले आहेत. कंदिलांच्या खरेदीला १ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून दसऱ्यानंतर खरेदीने जोर धरला आहे. २२ रंगांत सर्व प्रकारांचे कंदील बनवण्यात आले आहेत, अशी माहिती देसले यांनी दिली.