पावसाच्या दमदार हजेरीने लोकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:47 AM2020-09-24T00:47:49+5:302020-09-24T00:47:58+5:30

मंगळवारी रात्रभरात १६९ मिमी पाऊस : झाडे उन्मळून पडली, ठिकठिकाणी झाली वाहतूककोंडी

A torrential downpour of rain flooded the crowd | पावसाच्या दमदार हजेरीने लोकांची तारांबळ

पावसाच्या दमदार हजेरीने लोकांची तारांबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील काही दिवसापासून पावसाचा जोर ओसरला होता. मात्र मंगळवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपर्यंत शहरात १६९ मिमी पावसाची नोंद झाली तर बुधवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४३ मिमी पाऊस झाला. पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचले, तीन ठिकाणी वृक्ष तर मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.


गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. सांयकाळच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी बरसत होत्या. परंतु हवामान खात्याने २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. २२ तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास शहरात पाऊस बरसण्यास सुरवात झाली. सुरुवातीला हलक्या सरी बरसत होत्या. मात्र रात्री १२ नंतर पावसाने दमदार हजेरी लावली. रात्री ११.३० ते १२.३० या एका तासात ४५.४७ मिमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्री १ ते २.३० या काळात ४१.१५ मिमी पाऊस पडला. पहाटे साडेतीननंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पहाटे ५.३० ते ६.३० या कालावधीत केवळ ५.५९ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ८.३० पर्यंत १६९.१८ मिमी पावसाची नोंद झाली.


बुधवारी दिवसभर अनेक शहरांत सूर्यदर्शन झाले नव्हते. ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत होत्या. संध्याकाळी साडेपाचपर्यंत ४३ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ठाणे शहरात ३५९९ मिमी पाऊस झाला असून मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत ४३१९.९१ मिमी पाऊस झाला होता. मंगळवारीरात्री पडलेल्या पावसामुळे कळवा स्टेशन जवळील ‘सत्यम शिवम सुदंरम’ इमारतीच्या परिसरात पाणी साचले होते. चिखलवाडी, नौपाडा, राजहंस सोसायटी कळवा, जगदाळे वाडी कोपरी, सिध्दार्थ नगर कोपरी, गणपती मंदिर कोळीवाडा आदी भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. येथील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते, पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या गटारे तुडूंब भरली होती. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी नालेसफाई केली की, नाही, असा प्रश्न केला जात आहे. मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. तीन ठिकाणी वृक्ष कोसळले. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
बुधवारी सांयकाळी समुद्राला भरती असल्याने ४.०८ मीटर उंच लाटा उसळणार होत्या.

ठाण्यात ठिकठिकाणी साचले पाणी : मुसळधार पावसामुळे बुधवारी शहरात ठिकठिकाणी पाणी साचून वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली. पाणी तुंबल्याचे प्रकार शहरात जवळपास दहा ठिकाणी झाले. धोधो पाऊस आल्याने पुरेशा प्रमाणात पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी पाणी रस्त्यांवर तुंबले. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडीही झाली. ठाण्यात पाणी तुंबणार नाही, असा दावा दरवर्षी पालिकेकडून केला जातो. मात्र दरवर्षी हा दावा फोल असल्याचे सिद्ध होते. कोरोना काळातही लोकांकडून कराची अपेक्षा करणाऱ्या महानगरपालिकेने अशा मुलभूत समस्यांपासून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यापार्श्वभूमीवर होत आहे.

पावसाने उभेपीक केले उद्ध्वस्त... अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मांगरूळ, शिरवली आदी ग्रामीण भागात बहरून आलेले भातपीक कापणीच्या आधीच पावसाने पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: A torrential downpour of rain flooded the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.