मीरा-भाईंदरमध्ये परदेशातून आलेल्या लोकांची संख्या 342वर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 09:14 AM2020-03-23T09:14:40+5:302020-03-23T09:14:55+5:30
मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत परेदेशातुन परतलेल्या नागरिकांची संख्या ३४२ इतकी झाली असून, या पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली ...
मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत परेदेशातुन परतलेल्या नागरिकांची संख्या ३४२ इतकी झाली असून, या पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली आढळून आलेले नाही. तर शहरात परदेशातून येणा-या नागरिकांची विमानतळ प्राधिकरण व शासनाकडून वेळीच माहिती मिळत नसल्याने आलेल्या नागरिकांची माहिती पालिकेला वेळीच होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
परदेशातुन आलेल्या परंतु कोरोना नसलेल्या नागरिकांना खबरदारी म्हणून १४ दिवसांकरिता अलगीकरण केंद्रात ठेवण्याची आवश्यकता आहे. मीरा भाईंदरमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या ३४२ झालेली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली नसली तरी खबरदारी म्हणुन १४ दिवसांकरीता वेगळे ठेवण्याची आवश्यकता असल्याने पालिकेने भाईंदर पूर्वेला पालिका क्रीडा संकुलासमोरील इमारतीत अलगीकरण केंद्र सुरू केले आहे. तेथे सदद्या २५ नागरिकांना खबरदारी म्हणून वेगळे ठेवलेले आहे. २३६ जणांना त्यांच्या राहत्या घरीच ठेवलेले आहे. यातील ८१ जणांनी १४ दिवसांचा वेगळा राहण्याचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. ८ जणांना कस्तुरबा येथे तपासणी साठी पाठवले असता ६ जणांना कोरोनाची लागण नसल्याचा अहवाल आला आहे. तर दोघांचा अहवाल आला नसुन त्यांना सद्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेले आहे.
शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व पालिका - शासनांच्या सुचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान परदेशातुन येणाराया नागरिकांची माहिती पालिकेला मिळत नसुन आुबाजुचे रहिवाशीच असे कोणी आले की पालिकेला कळवत आहेत. त्यातही पालिके कडुन अशा लोकांशी वेळीच संपर्क केला जात नसल्याचे काही प्रकरणात समोर आले आहे. तर असे काही नागरिक परदेशातुन आले तर त्यांच्या कडे जाण्यासाठी वैद्यकिय पथकां कडे स्वतंत्र वाहनेच नसल्याचे देखील उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिकेच्या गाड्या गेल्या कुठे असा सवाल देखील केला जात आहे.