रिपाईच्या दोन गटात तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:23 PM2018-03-09T17:23:23+5:302018-03-09T17:23:23+5:30
डोंबिवली: केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास घडला. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे निष्क्रिय ठरले असून त्यांना हटवण्यात यावे या मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रिपाई युवक आघाडी आणि झोपडपट्टी महासंघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेथे पोहोचलेल्या जिल्हाध्यक्ष जाधव यांनी सभेच्या आयोजकांना मारहाण केली. यावेळी काही महिलांना देखील हाणामारी झाल्याने सभागृहात उपस्थित असलेल्या महिलांनी जाधव यांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे रिपाईमधील गटबाजी उघड झाली असून या हाणामारीचा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले कसा समाचार घेतात याकडे लक्ष लागले आहे.

केडीएमसीच्या विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सभेला पक्षाचे वरिष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, युवक आघाडीचे संग्राम मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीना साळवे, जिल्हा सचिव तथा माजी नगरसेवक भीमराव डोळस आणि झोपडपट्टी महासंघाचे स्थानिक अध्यक्ष माणिक उघडे आदि उपस्थित होते. या सभेच्या आधी पत्रकार परिषद झाली. पार पडलेल्या सभेत जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांना हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. जाधव यांच्या निष्क्रिय कारभारामुळे पक्षाची अधोगती झाली असून याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सांगण्यात आले आहे जर आठवले यांनी महिनाभरात निर्णय घेतला नाहीतर नवीन कार्यकारीणी नेमून नवा जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दलित वस्ती सुधारणा किंवा अन्य योजना अंतर्गत एकुण अर्थसंकल्पाच्या टककेवारीनुसार (सुमारे १० टकके) देखिल तरतूद केली जात नसल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा येत्या १४ एप्रिलच्या आत बसविण्यात यावा या मागणीसह १६ मार्चला दिल्ली येथे होणा-या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासंदर्भात सभेत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान सभा सुरू असताना अचानक जिल्हाध्यक्ष जाधव हे त्याठिकाणी पोहोचले आणि आयोजकांना तुम्हाला सभा घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल करीत त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. अचानक झालेल्या प्रकाराने सभागृहात एकच गोंधळ उडाला. व्यासपिठावर उपस्थित असलेल्या डोळस, उघडे यांना जाधव यांच्याकडून मारहाण करण्यात आली. यावेळी मध्यस्ती करणा-या महिलांना देखील जाधव यांनी मारहाण केली. यात महिलांकडूनही जाधव यांना बेदम मारहाण करण्यात आली. या हाणामारीची माहीती मिळताच महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी सभागृहाच्या दिशेने धाव घेतली. स्थानिक रामनगर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. तेथील सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र वाडेकर आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंह पवार यांनी घटनास्थळी धाव घेत हाणामारी करणा-यांना ताब्यात घेतले. मी गेली २० ते २५ वर्षे जिल्हाध्यक्ष आहे. सोशल मिडीयावर काहीजण चुकीची पोस्ट टाकत असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत त्याबाबत आपण एमएफसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जेव्हा एखादा कार्यक्रम करताना शहरातील प्रमुख पदाधिका-यांना माहीती देणे आवश्यक होते परंतू त्यांनी कोणतीही विचारणा केलेली नाही. मी फक्त समजविण्यासाठी गेलो होतो कोणालाही मारहाण केलेली नाही अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. तर महिलांना मारहाण केल्याप्रकरणी जाधव यांच्याविरोधात आम्ही विनयभंगाची तक्रार करणार असल्याची माहीती महिला जिल्हाध्यक्ष मीना साळवे यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.