जिल्ह्यातील पर्यटकांची ‘टूर-टूर’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:53 AM2020-11-23T00:53:33+5:302020-11-23T00:53:44+5:30
ठाणेकरांची गोवा, महाबळेश्वरला पसंती
कोरोनामुळे सात ते आठ महिन्यांपासून घरात बसलेल्या नागरिकांनी दिवाळीच्या सुटीत नियमांचे पालन करत बाहेर जाण्याचा बेत आखला. लाॅकडाऊनमुळे जवळपास सहा, सात महिने घरात अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी अनलाॅक आणि दिवाळीची सुटी म्हणजे दुग्धशर्करा योगच झाला. या सुटीत विविध शहरांंतील पर्यटक नेमके कुठे गेले, कोणत्या पर्यटनस्थळांना पसंती दिली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशी खबरदारी घेतली, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा...
n अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अनलॉकपासून हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. परंतु, नागरिकांच्या मनात आजही भीती कायम आहे. असे असतानाही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये १५ टक्के लोकांनीच काही पर्यटनस्थळांना किंवा पिकनिक स्पॉटला भेटी दिल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेकांची पहिली पसंती ही कोकण तसेच गोवा, त्यानंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला आणि लोणावळ्याला दिली आहे. अलिबागला पाच टक्के पर्यटकांनी पसंती दर्शविली आहे.
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पर्यटनस्थळेही खुली झाली. परंतु, फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती कायम आहे. त्यामुळेच आजही दिवाळीची सुट्टी असतानाही ज्या ठिकाणी कोरोनाची भीती नाही, अशा ठिकाणी फिरण्यास ठाणेकरांनी पसंती दिली आहे. यासाठी गुगल सर्च करण्यात आले. कुठे काय परिस्थिती आहे, फिरण्यास गेल्यावर धोका तर नाही ना, या सर्वांची खातरजमा करून पर्यटकांनी पर्यटनस्थळ निवडले. १० टक्के ठाणेकर पर्यटकांनी गोवा, किंबहुना कोकणला पसंती दिल्याची माहिती ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी दिली आहे. त्या खालोखाल महाबळेश्वरलाही पसंती दिली आहे.
मागील वर्षीसारखी यंदा परिस्थिती नाही. पर्यटकांनीही फारसे कुठे जाण्यास पसंती दिलेली नाही. त्यातही जे काही १० ते १५ टक्के पर्यटक बाहेर पडले त्यांनी गोवा, महाबळेश्वर आणि लोणावळ्याला पसंती दिली आहे.
- शैलेश बोरनारे, व्यावसायिक
येऊरचे बंगलेही फुल्ल
ठाण्यातील थंड हवेचे, किंबहुना एकही कोरोना रुग्ण न आढळल्याचे ठिकाण म्हणजे येऊरची ओळख झाली आहे. दिवाळीतही शनिवारी आणि रविवारी खवय्यांबरोबर येथे असलेल्या बंगल्यांवर पर्यटकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. येथील बंगले फुल्ल झाल्याचे दिसून आले.
यंदा दिवाळीच्या सुट्टीत कोकण वगळता इतर कोणत्याही ठिकाणाला पर्यटकांनी पसंती दिलेली नाही. त्यातही यंदा फिरण्यास जाणाऱ्यांचे प्रमाण नगण्यच राहिले आहे.
- विकास शेलार, व्यावसायिक