पर्यटन खात्याचे वेगळं बजेट करावे लागेल - ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:08 AM2020-02-25T00:08:51+5:302020-02-25T00:09:02+5:30
पर्यटन खात्यासाठी वेगळे बजेट करावे लागेल, असे मत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले.
ठाणे : पर्यावरण खात्यात आधी उत्साह नव्हता. पण हे खाते माझ्याकडे आल्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील आमदार पर्यटन विभागाशी निगिडत मागण्या घेऊन येत आहेत. त्या लक्षात घेता पर्यटन खात्यासाठी वेगळे बजेट करावे लागेल, असे मत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुक्यात प्रेक्षणीय स्थळे आहेत. ती आपण जगाला दाखवू शकतो. ग्रामीण आणि शहरी भागात सरकार चांगली कामगिरी करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. आ. सरनाईक यांनी घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनाची मागणी केली. त्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या समारोप सोहळ्यासाठी ते ठाण्यात आले होते. कला संस्कृती जोपासण्यासाठी असे महोत्सव इतरत्र होण्याची गरज आहे. नाईट लाईफला मुंबईत कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहू. मग टप्प्याटप्प्याने यासाठी ठाण्याचा विचार करु, असे ते यावेळी म्हणाले. आ. प्रताप सरनाईक यांनी उपवन तलावाचा पर्यटनस्थळात समावेश करण्याची मागणी ठाकरे यांच्याकडे केली असता त्यांनी सकारात्मकता दाखवली.