पाण्याच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:08+5:302021-06-25T04:28:08+5:30
मीरा रोड : पावसाळ्यात समुद्र, धबधबे, धरण, नदी, खाडी, तलाव आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाने १८ ...
मीरा रोड : पावसाळ्यात समुद्र, धबधबे, धरण, नदी, खाडी, तलाव आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाने १८ ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे. त्यासाठी कलम १४४ नुसार फौजदारी मनाई आदेश पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी जारी केला आहे.
मीरा-भाईंदर-वसई-विरार हद्दीत विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. याठिकाणी हॉटेल, लॉज माेठ्या संख्येने असून, येथे पर्यटक मौजमजेसाठी येत असतात. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण हाेताे. समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या नेहमीच घटना घडतात. अशाच प्रकारे चिंचोटीसारख्या धबधब्याच्या ठिकाणी वर्षासहलीसाठी आलेले पर्यटक पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे गावात असलेल्या लक्ष्मी नदी परिसरातही अनेक तरुण मद्य पार्टी झोडायला येतात. नदीत पोहायला उतरणाऱ्यांनी जीव गमावल्याच्या घटना येथे दरवर्षी घडत असतात. त्या अनुषंगाने पावसाळ्यात जीवितहानी रोखण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी मनाई आदेश जारी केला असून, १८ ऑगस्टपर्यंत समुद्र, धबधबे, नदी, धरण आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास तसेच पाण्यात उतरण्यास पर्यटकांना कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे.
उल्लंघन केल्यास फाैजदारी कारवाई
याठिकाणी सेल्फी काढणे, मद्यपान करणे, मद्यविक्री करणे, ध्वनिक्षेपक डीजे वाजवणे, रस्त्यांवर वाहने थांबवणे, प्लास्टिक-थर्माकोलचा कचरा टाकणे आदींवर बंदी घातली आहे. ध्वनी, वायू व जल प्रदूषण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.