येऊर परिसरातील धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:55 PM2024-07-29T22:55:04+5:302024-07-29T22:55:13+5:30

वनविभागाने घातले निर्बंध : प्रवेशद्वार सायंकाळी ७ नंतर राहणार बंद.

Tourists are prohibited from going to the waterfall in Yeur area | येऊर परिसरातील धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी

येऊर परिसरातील धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी

जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावसाळ्यात धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक वाढत्या पाण्यात अडकून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येऊर परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यासाठी वनविभागाने बंदोबस्त नेमला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील येऊरच्या जंगलातील धबधबे हे तरुण पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. परंतु, धबधब्यांचे पाणी वाढल्यानंतर धबधब्यांच्या जवळील नाल्यांत अनेकवेळा पर्यटक अडकल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. लोणावळा आणि राज्यभरातील धबधब्यांच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर येऊरच्या धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. येऊर परिसर हा संरक्षित घोषित केला असल्याने या ठिकाणी जाण्याला बंदी आहे. तरीही काही उत्साही तरुण छुप्या वाटेने या ठिकाणी पोहोचतात. पावसाळ्यात येऊरमध्ये होणाऱ्या मद्य पार्ट्यांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन गेटवर वनविभागाकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते. सुरक्षेचा उपाय म्हणून येऊर प्रवेशद्वार सायंकाळी ७ वाजेनंतर बंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा, गावातील नागरिक, वायू दलाचे अधिकारी, पोलिस आणि वन कर्मचारी यांनाच सायंकाळी ७ वाजेनंतर येऊरला प्रवेश देण्यात येतो, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Tourists are prohibited from going to the waterfall in Yeur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे