पर्यटकांसाठीच्या फेरी बोटींआड वसई खाडीत बोट पार्ट्यांना उत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 08:38 PM2018-11-13T20:38:46+5:302018-11-13T20:40:00+5:30
मीरारोड - भार्इंदर पुर्वेच्या जेसलपार्क लगतच्या खाडीत पर्यटनाच्या नावाखाली बोटीत चक्क पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. या प्रकरणी मेरी ...
मीरारोड - भार्इंदर पुर्वेच्या जेसलपार्क लगतच्या खाडीत पर्यटनाच्या नावाखाली बोटीत चक्क पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. या प्रकरणी मेरी टाईम बोर्डासह पालिका व पोलीस प्रशासन देखील डोळेझाक करत आहे.
भार्इंदर पुर्वेला जेसल पार्क येथे पालिकेने कचरा - मातीचा बेकायदा भराव करुन बांधकामे केली असून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी पालिका व मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर गुन्हे दाखल आहेत.
सदर ठिकाणी मेरी टाईम बोर्डाने पर्यटनासाठी बांधलेली जेट्टी अनेक वर्ष वापराविना पडूनच आहे. तर खाडीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यातच बोटींगसाठी पर्यटकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आधीच्या कंत्राटदाराने बोटींग बंद केली होती.
दरम्यान, या ठिकाणी द गुड लाईफ बोटींग या नावाखाली प्रती पर्यटक ६० रुपये प्रमाणे २५ ते ३० मिनिटांसाठी शुल्क आकारणीचे फलक लावलेले आहेत. पर्यटकांकडून उपरोक्त शुल्क आकारतानाच चक्क पार्टीसाठी देखील बोट भाड्याने दिली जात आहे. त्यासाठी प्रती तास २ हजार रुपयांचे शुल्क सांगितले जात असून अनेक बोट पार्ट्या होत आल्या आहेत. फलकावर सुध्दा बोट पार्ट्यांची छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत.
सदर पार्ट्या रात्री उशीरापर्यंत चालत असून त्यात मद्यपान आदी होत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. येथे पोलीस चौकी असुन पालिकेचे सुरक्षा रक्षक सुध्दा असतात. पण बोटीची वेळ व होणाऱ्या पार्ट्यांकडे डोळेझाक केली जाते. शिवाय कोणतीही तपासणी वा यंत्रणा नसल्याने गैरवापर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
वास्तविक नियमानुसार फक्त प्रती पर्यटक प्रमाणे शुल्क आकारले गेले पाहिजे. रात्रीची परवानगी नसते. पार्टीसाठी तर बोट भाड्याने देता येत नाही. सदर बोटींग प्रकरणी कोणती परवानगी आहे. या बद्दलची माहिती आपण मागवली आहे. चौकशी करुन कारवाई करु.- जी. बी. राठोड (बंदर निरीक्षक, मेरी टाईम बोर्ड )