आपल्या सरकारला विकास म्हणजे काय हेच समजत नाही : सुलक्षणा महाजन
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 27, 2024 01:59 PM2024-05-27T13:59:53+5:302024-05-27T14:07:17+5:30
यशस्वी आणि शाश्वत शहराच्या निर्मितीची कथा याविषयावर आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपले मत व्यक्त केलं.
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : आपल्या देशातील शहरे ही बकाल आहे. आपल्या शहरांना स्वातंत्र्य नाही. विकासाच्या नावार निसर्गावर घाला घातला जात आहे. सरकारची धोरणे चुकीची आहेत. मुळात सरकारला विकास म्हणजे काय हेच समजत नाही. सिंगापूर या शहराने निसर्गसृष्टी, अर्थसृष्टी आणि नागरसृष्टी या तीन सृष्टीचा समन्वय त्यांनी साधना आणि त्यातून एक चांगले प्रगत शाश्वत शहर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना त्यांनी निसर्गाचा सांभाळ देखील केला. सिंगापूर हा देश छोटा आणि आपला देश खूप मोठा असला तरी छोट्या कडून मोठ्याला खूप शिकण्याजोगे आहे आणि ते त्यांनी शिकावे असे आवाहन नगर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी केले.
एपिकॉन्स फ्रेंड्स ऑफ कॉन्क्रीट आयोजित सिंगापूरनामा : यशस्वी आणि शाश्वत शहराच्या निर्मितीची कथा याविषयावर आपले मनोगत व्यक्त करताना महाजन म्हणाल्या की, सिंगापूर हा देश देखील भारतासारखा गरिब देश होता. जेव्हा हा देश मलेशियापासून वेगळा झाला त्यावेळी त्यांनी आपले शहर चांगले करण्याचे ठरविले. गरिबी हटविण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी नियोजन सुरू केले आणि ते नियोजन प्रत्यक्षात आणले. कमी कालावधीत झोपडपट्टीविरहीत शहर निर्माण करणारे जगातील एकमेव शहर म्हणजे सिंगापूर. परंतू शहराचे नियोजन करत असताना त्यांनी निसर्गाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी आयात आणि निर्यात याचा उत्तम समतोल साधला. प्रदुषणमुक्त, हरित, सदाबहार शहर म्हणून या शहराची ओळख आहे. वाहनांमधून येणाऱ्या कराचा पैसा त्यांनी सार्वजनिक वाहतूकीवर खर्च केला. तेथे असलेल्या डोंगर दऱ्यांमध्ये कोणाला प्रवेश नाही. तेथील जैवविविधतेचा ते योग्यरितीने सांभाळ करतात. अशा तऱ्हेने सिंगापूरने प्रयत्नपुर्वक गरिबी दूर करुन समाज संपन्न केला. त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नसताना हे शहर समृद्ध होऊ शकते, स्वत:चा विकास करु शकते तर भारताकडे इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे तर भारताचा देखील असा विकास का होऊ शकत नाही? याचे कारण म्हणजे आपल्याकडे बुद्धीमान लोकांना महत्त्व दिले जात नाही असे त्या म्हणाल्या.
आयोजक जयंत कुलकर्णी यांनी नरेंद्र बल्लाळ सभागृहात शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुधीर बदामी, विवेक गोविलकर आणि अलका धुपकर हे सहवक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्थ अभ्यासक संजीव चांदोरकर यांनी केले.