डिझेल मिळाल्यानंतर एसटी ठाण्यात रुळावर; १५० गाड्या डिझेलविना होत्या उभ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 08:02 AM2021-03-25T08:02:00+5:302021-03-25T08:02:14+5:30
ठाणे जिल्ह्यातील १ नंबरचा डेपो म्हणून खोपट डेपोची ओळख आहे; परंतु या डेपोवर सोमवारपासून डिझेल नसल्याने एसटीच्या सुमारे १५० बसेस येथे उभ्या असल्याचे दिसून आले.
ठाणे : मागील पाच दिवसांचे डिझेलचे पैसे न दिल्याने ठाण्यातून सुटणाऱ्या तब्बल १५० एसटीच्या बसेस खोपट आगारात थांबल्याची बाब उघड झाल्यानंतर बुधवारी एसटीचे ‘ऑपरेशन’ पुन्हा सुरू झाले आहे. मंगळवारी रात्री डिझेलचा एक टँकर उपलब्ध झाल्यानंतर बुधवारी १५० हून अधिक बसेस रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली.
ठाणे जिल्ह्यातील १ नंबरचा डेपो म्हणून खोपट डेपोची ओळख आहे; परंतु या डेपोवर सोमवारपासून डिझेल नसल्याने एसटीच्या सुमारे १५० बसेस येथे उभ्या असल्याचे दिसून आले. यामध्ये शिवनेरी, शिवशाही बसेसचादेखील समावेश होता. या डेपोतून कोकणातील सर्व मार्गांवर तसेच नाशिक, शिर्डी, नगर, सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, वडुज, दहीवडी, अलिबाग, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आदींसह राज्यातील इतर प्रमुख मार्गांवर बसेस धावत असतात. सोमवारी दुपारनंतर यातील एकही बस रस्त्यावर धावू शकली नव्हती. डिझेल पंप चालकांचे पाच दिवसांचे ६५ लाख रुपये थकविल्याने एसटी महामंडळावर ही नामुश्की ओढवली होती. मंगळवारी दुपारनंतर ही समस्या मार्गी लागेल, असा दावा एसटी विभाग ठाणे यांच्याकडून करण्यात आला होता. परंतु तो दावादेखील फोल ठरला.
मंगळवारी रात्री जेमतेम एक टँकर दाखल झाल्यानंतर रात्रभर १५० बसेसमध्ये डिझेल टाकण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळपासून एसटीची सेवा पुन्हा सुरू झाली. यामध्ये शिवनेरी आणि शिवशाही बसेसदेखील बाहेर निघाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली. परंतु केवळ एकच टँकर उपलब्ध झाल्याने तूर्तास दिलासा मिळाला असला तरी रेग्युलर टँकर उपलब्ध होणार का, याबाबत मात्र शंका उपस्थित करण्यात आलेली आहे. तसेच डिझेल पंप चालकाला अर्धे पैसे दिल्यानंतर हा एक टँकर उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे पुन्हा तो केव्हा असहकार पुकारेल याबाबतही नेम नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी रात्री डिझेलचा एक टँकर उपलब्ध झाल्यानंतर सुमारे १५० बसेसमध्ये डिझेल भरण्यात आले असून, त्या बुधवारी सकाळपासून मार्गस्थ झालेल्या आहेत. नेहमीप्रमाणे आता या बसेस रस्त्यावर धावणार आहेत. - विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक, ठाणे)