रुंदीकरणाविरोधात व्यापारी आक्रमक
By Admin | Published: January 7, 2016 12:46 AM2016-01-07T00:46:33+5:302016-01-07T00:46:33+5:30
स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत कल्याण शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतली
कल्याण : स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत कल्याण शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतली आहे. याबाबत, विश्वासात न घेता अन्यायकारक नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून या कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बुधवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.
दरम्यान, भाजपाचे मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार हे व्यापाऱ्यांच्या मदतीला धावले. एकीकडे स्मार्ट सिटीची स्वपे्न दाखवायची आणि दुसरीकडे या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कारवाईविरोधात भूमिका घ्यायची, असे भाजपाचे मंत्री-नेते यांनी सुरू केल्याने यातून पक्षाची दुटप्पी भूमिका समोर आल्याचे दिसले.
या रस्ता रुंदीकरणात सध्या कल्याण बाजारपेठेतील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी या परिसरातील ४०० व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यावर, व्यापाऱ्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी चर्चा केली. पण, कोणताही मार्ग न निघाल्याने मंगळवारी त्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला. सायंकाळी बैठकीत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करून कदापिही स्मार्ट सिटी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिली. तसेच सेनेची लुडबुड सहन करणार नाही असे सांगितले.
व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मंगळवारी निषेध नोंदविला. पुन्हा बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. यानंतर, पालिका मुख्यालयातील महापौरांच्या दालनात बैठक
पार पडली.
या वेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह गृहनिर्माणमंत्री मेहता, प्रवीण दरेकर, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, आमदार रवींद्र चव्हाण, उपमहापौर विक्रम तरे, राकेश मुथा आदी भाजपा नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त रवींद्रन हे मंत्रालयात कामानिमित्त गेल्याने त्यांच्याऐवजी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी त्यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाची कारवाई चुकीची आहे.
धमकाविले जात असून याआधी रुंदीकरणाची कारवाई केली आहे, तेथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याकडे व्यापाऱ्यांनी पुन्हा लक्ष वेधले. आयुक्त आणि व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडणे महत्त्वाचे असल्याचे म्हणणे व्यापाऱ्यांनी मांडले. यावर, आयुक्तांपर्यंत या भावना पोहोचवल्या जातील, असे आश्वासन घरत यांनी दिले.