दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:23+5:302021-07-23T04:24:23+5:30
ठाणे : मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातील विविध व्यापारी संघटनांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. खाद्यपदार्थांची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतात. ...
ठाणे : मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातील विविध व्यापारी संघटनांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. खाद्यपदार्थांची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतात. मात्र इतर दुकाने दुपारी ४ वाजताच बंद होत आहेत. कोरोना नियमांचे पालन करून इतर आस्थापना रात्री ८ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी न दिल्याने गुरुवारी ठाण्यातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरुवारी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यापुढेही शासनाने दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली नाही तर संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचा इशारा ठाण्यातील व्यापाऱ्यांनी दिला आहे.
गुरुवारी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे ठाणे शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सरकार एका बाजूला ई-कॉर्मसला पूर्ण दिवस व्यवसाय करायला परवानगी देते आणि ज्या व्यापाऱ्यांमुळे रोजगारनिर्मिती होते त्यांना दुपारी ४ वाजता दुकाने बंद करायला सांगते. मागील १६ महिन्यांपासून व्यापारी त्रासलेले आहेत. व्यापार करणे हा आमचा हक्क आहे, तो आमच्याकडून हिरावून घेऊ नका. व्यापाऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. कामगारांचे पगार, दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्ते, सरकारचे सर्व प्रकारचे कर भरताना व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
सरकार व्यापाऱ्यांबरोबर दुटप्पी व्यवहार करीत असल्याचा आरोप यावेळी व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा यांनी केला. या आंदोलनात शहरातील व्यापारी, दुकानात काम करणारे कामगार उपस्थित होते. भाजपचे आमदार संजय केळकर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आदींनी हजेरी लावून या आंदोलनाला पाठिंबा दिला.