उल्हासनगरात व्यापारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आमने-सामने
By सदानंद नाईक | Published: March 4, 2023 05:24 PM2023-03-04T17:24:28+5:302023-03-04T17:28:09+5:30
उल्हासनगर : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या साहित्यावर शुक्रवारी कारवाई केली. या ...
उल्हासनगर : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या साहित्यावर शुक्रवारी कारवाई केली. या कारवाईवरून व्यापारी व विभागाचे कर्मचारी आमने-सामने येऊन धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याने, महापालिका कारवाईवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.
उल्हासनगरातील बहुतांश मार्केट परिसरात दुकानदार रस्त्याच्या फुटपाथवर विक्रीसाठी साहित्य ठेवत असल्याने, नागरिकांना फुटपाथ ऐवजी रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका अतिक्रमण पथक रस्त्याच्या फुटपाथवर दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवलेल्या साहित्यावर कारवाई करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहर पश्चिम मध्ये अशीच कारवाई अतिक्रमण पथकाने केली. तर शुक्रवारी कॅम्प नं-५ येथील मार्केट मध्ये कारवाई सुरू केली. या कारवाईने व्यापारी मध्ये रोष व्यक्त होऊन त्यांनी अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिका अतिक्रमण पथकातील कर्मचारी दादागिरीने साहित्य उचलत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही.
महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी व्यापारी व अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्यात तू तू मैं मैं झाल्याची कबुली दिली. मात्र व्यापाऱ्यांनी नंतर याप्रकरणी माफी मागितल्याने, गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती दिली. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा शिंपी यांनी दिली. मुख्य मार्केट मध्ये व्यापाऱ्यांनी स्वतःच्या सोयीसाठी दुकानाच्या व थेट फुटपाथच्या समोर लोखंडी जाळी सर्रासपणे लावण्यात येत आहे. या लोखंडी जाळीवर महापालिका अतिक्रमण पथकाने कारवाई केल्यास वाहतूक कोंडीची समस्या निकाली लागणार असल्याची प्रतिक्रिया विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिली. महापालिका अतिक्रमण पथकाच्या कारवाई पाठोपाठ रस्त्याच्या फुटपाथवर पुन्हा दुकानदार साहित्य ठेवत असल्याचे चित्र शहरात आहे. याबाबत महापालिकेने विचार करण्याची गरज असल्याचे मत मनसेने व्यक्त केले.