उल्हासनगरात दुकानावरील मराठी पाट्यासाठी व्यापारी संघटना रस्त्यावर
By सदानंद नाईक | Published: December 9, 2023 01:47 AM2023-12-09T01:47:03+5:302023-12-09T01:47:43+5:30
शहरात व्यापारी संघटनेने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
उल्हासनगर : मुंबईसह इतर ठिकाणी मराठी पाट्यावरून रणकंदन माजले असतांना शहरातील व्यापारी संघटनेच्या नेत्यांनी, मात्र रस्त्यावर उतरून दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे जाहीर आवाहन केले. शहरात व्यापारी संघटनेने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी मराठी पाट्यावरून, गेल्या आठवड्यात व्यापारी, राजकीय नेते व महापालिका अधिकारी यांनी बैठक घेतली होती. आमदार कुमार आयलानी यांनीही मराठी पाट्या लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तर मनसेचे नेते बंडू देशमुख यांनी मराठी पाट्या न लावणाऱ्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. या बैठकीला उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे जगदीश तेजवानी यांच्यासह अन्य संघटनेचे पदाधिकारी होते.
मराठी पाटी ठळक अक्षरात तर दुकानदारांच्या आवडीच्या भाषेचे नामफलक लहान अक्षरात लिहिण्याचे आवाहन यावेळी मनसेसह महापालिका प्रशासनाने केले होते. मनसेच्या नेत्यांनी शहरातील प्रत्येक आस्थापनावर मराठी पाट्या न लावणाऱ्या विरोधात खळखठ्याल आंदोलनाचा इशारा दिल्याने, व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती.
शहरातील व्यापारी संघटनेच्या बहुतांश नेत्यांनी आयुक्तांच्या बैठकीत मराठी नामफलक लावण्याचे आश्वासन दिल्यावर, व्यापारी नेते जगदीश तेजवानी यांच्यासह त्यांच्या टीमने पुढाकार घेऊन मराठी नामफलक दुकानावर लावण्यासाठी दुकानदारांना जाहीर आवाहन केले. तसेच दुकानदारांच्या भेटीगाठी घेऊन मराठी नामफलक दुकानावर लावण्यासाठी रस्त्यावर उतरले. सोशल मीडिया, स्थानिक न्यूज चॅनेल, दुकानात प्रत्यक्ष जाऊन मराठी नामफलक दुकानावर लवकरात लवकर लावण्याचे आवाहन उल्हासनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने केले जात आहे. अशी माहिती तेजवानी यांनी दिली. मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे यांनी मराठी पाट्या लावण्यासाठी व्यापारी संघटनेला सहकार्य करीत आहेत. एका महिन्यात शहरातील सर्वच आस्थापनावर मराठी भाषेत ठळकपणे नामफलक लावून, मराठी भाषेचा आदर सर्वांनी करावा. अशी इच्छा बंडू देशमुख यांनी व्यक्त केली आहे