एनआरसी कामगारांच्या पाठिंब्यासाठी व्यापाऱ्यांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:15 AM2021-02-18T05:15:38+5:302021-02-18T05:15:38+5:30

कल्याण : आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी न देता अदानी ग्रुप कंपनीने कंपनीच्या कामगारांच्या घरांवर हातोडा चालविण्यास ...

Traders close to support NRC workers | एनआरसी कामगारांच्या पाठिंब्यासाठी व्यापाऱ्यांचा बंद

एनआरसी कामगारांच्या पाठिंब्यासाठी व्यापाऱ्यांचा बंद

Next

कल्याण : आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी न देता अदानी ग्रुप कंपनीने कंपनीच्या कामगारांच्या घरांवर हातोडा चालविण्यास सुरुवात केली आहे. या एकतर्फी कारवाईविरोधात आणि थकीत देणी मिळावी या मागणीसाठी एनआरसी कामगार संघर्ष समितीने कंपनीसमोरच बेमुदत धरणे आंदोलन पाच दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलास पाठिंबा देण्यासाठी आंबिवली, मोहने, आटाळी आणि गाळेगाव परिसरातील व्यापाऱ्यांनी बुधवारी बंद पाळला. आमदार विश्वनाथ भोईर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला.

भोईर यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून एनआरसीचे कामगार त्यांच्या न्याय हक्काच्या थकीत देण्यासाठी संघर्ष करीत आहे. हे कामगार आता रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी भोईर यांनी केली आहे. या आंदोलनास त्यांनी शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. कामगारांच्या धरणे आंदोलनास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचा पाठिंबा आंदोलनास मिळत असल्याने कामगारांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. त्यात आंबिवली, मोहने, आटाळी आणि गाळेगाव या चारही गावांनी बंद पाळून दिलेला पाठिंबा हा कामगारांना दिलासा देणारा आहे.

कंपनी २००९ पासून बंद आहे. जवळपास साडेचार हजार कामगारांची थकीत देणी अद्याप दिलेली नाही. थकीत देण्याचा विषय नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलकडे न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, कंपनीने अदानी ग्रुपला जागा दिलेली आहे. या कंपनीकडून कामगार वसाहतीमधील घरे पाडण्याचे काम सुरू आहे. त्याला कामगारांनी वारंवार विरोध केला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कंपनी व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन देणी दिली जात नाही तोपर्यंत पाडकाम स्थगित करण्याचे सांगितले होते. त्यानंतरही पाडकाम सुरू असल्याने अखेरीस कामगारांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, मंगळवारी कामगार आयुक्त चंद्रकांत कल्याणकर यांच्याकडे एनआरसी कामगार संघर्ष समितीने त्यांचे काय म्हणणे आहे याचे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनाचा विचार करून सविस्तर अहवाल तयार करून तो कामगारमंत्र्यांना सादर केला जाईल, असे आश्वासन कल्याणकर यांनी कामगार संघर्ष समितीला दिले असल्याची माहिती भीमराव डोळस आणि रामदास पाटील यांनी दिली आहे.

फोटो-कल्याण-बंद

------------------

Web Title: Traders close to support NRC workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.