निर्बंधांकडे व्यापाऱ्यांचा सोईस्करपणे कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:07+5:302021-04-01T04:42:07+5:30
डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केडीएमसीने घालून दिलेल्या निर्बंधांकडे व्यापाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. रात्री ८ नंतर अत्यावश्यक ...
डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केडीएमसीने घालून दिलेल्या निर्बंधांकडे व्यापाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही डोंबिवलीतील काही भागांमध्ये सर्रासपणे दुकाने खुली ठेवून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. विशेषत: रेल्वे स्थानक परिसरात हे चित्र दिसून येत आहे.
कल्याण-डोंबिवलीत दररोज हजाराच्या आसपास रुग्णसंख्या आढळून येत असल्याने नव्या रुग्णांना उपचारासाठी बेड मिळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मनपा हद्दीत वाढलेला कोरोना पाहता आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांची गर्दी टाळावी, या उद्देशाने अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत डोंबिवलीत ठिय्या आणि रास्ता रोको आंदोलन करून आदेश प्रशासनाला मागे घेण्यास भाग पाडले. याआधी आयुक्तांनी दुकाने रात्री ८ नंतर बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या आदेशाचेही योग्य प्रकारे पालन व्यापाऱ्यांकडून होत नाही. आदेशाचे पालन होते का, हे पाहण्यासाठी कल्याणमध्ये सूर्यवंशी तर डोंबिवलीत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना रस्त्यावर उतरावे लागले होते. यात त्यांना बहुतांश दुकाने ८ नंतर सुरू असल्याचे निदर्शनास पडले होते. आजही हेच चित्र सर्रासपणे दिसत असून रात्री ८ नंतर दुकाने बंद करण्याच्या नियमांचे व्यापाऱ्यांकडून उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळते.
लोकप्रतिनिधींचा पाठिंबा व्यापाऱ्यांना मिळत असल्याने ते प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुमानत नसल्याची चर्चा असून, अशावेळी स्थानिक पोलिसांची बोटचेपी भूमिकाही व्यापाऱ्यांच्या वृत्तीला एकप्रकारे पाठबळ देणारी ठरत आहे. शनिवारी व्यापाऱ्यांच्या सहा ते सात तास चाललेल्या आंदोलनाच्या वेळीही पोलिसांनी घेतलेली नरमाईची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. अखेर प्रभाग अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
--------------
गस्त वाढविण्याची मागणी
महापालिका कर्मचाऱ्यांची ड्युटी संपल्यानंतर रात्रीच्या वेळेत खाद्यपदार्थाच्या हातगाड्या बिनदिककतपणे रस्त्यावर लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी वाढून सोशल डिस्टिन्संगचा फज्जा उडून नियमांचे उल्लंघन होत आहे. यासंदर्भात प्रभाग अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना पत्र पाठवून गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. रात्री ८ नंतरही सुरू असलेल्या दुकानदारांवरही कारवाई करावी, याकडे लक्ष वेधले आहे.
--------------------