रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:26+5:302021-07-16T04:27:26+5:30
ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खाद्यपदार्थांची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतात, ...
ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खाद्यपदार्थांची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतात, तर इतर दुकाने दुपारी चार वाजताच बंद करण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल करतानाच व्यापाऱ्यांनी दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गुरुवारी शहरातील विविध व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला नाही, तर निर्बंध झुगारून दुकाने चारनंतर पुढे उघडीच ठेवणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देणारा निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र केंद्राच्या भूमिकेमुळे किमान एक आठवडा तरी राज्यातील निर्बंध कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील व्यापाऱ्यांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. आता ठाण्यातील व्यापाऱ्यांना निर्बंधांमुळे व्यवसाय करणे कठीण झाले असून, व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ठाण्यात कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली असून, भाजीपाला आणि खाद्यपदार्थांची दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बऱ्यापैकी सुरू झाली आहे; मात्र व्यापाऱ्यांनाच दुकाने चार वाजल्यानंतर बंद करण्याची सक्ती केली जात आहे, अशी व्यापाऱ्यांची तक्रार आहे. व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बँकांचे हप्ते, कामगारांचे पगार, घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. आता तर काही व्यापाऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता कायद्याचे उल्लंघन करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली असून, तशी वेळ येऊ देऊ नका, असा इशाराच व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
नौपाडा व्यापारी मंडळ, ठाणे व्यापारी संघ, ठाणे सुभाष पथ व्यापारी वेल्फेअर असोशिएशन, कळवा सराफ असोशिएशन आणि एकता लाँड्री असोसिएशन या सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी जिल्हाधिकारी नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
............
"आतापर्यंत व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले; मात्र आता व्यापाऱ्यांची सहनशक्ती संपली असून, व्यापाऱ्यांच्या मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. व्यापाऱ्यांना जगणे कठीण झाले असून, आमच्याकडे आता कायद्याचे उल्लंघन करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिलेला नाही."
- मितेश शाह, अध्यक्ष, नौपाडा व्यापारी मंडळ
...........
वाचली