लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध; दुकाने बंद ठेवूनही कोरोना रुग्णसंख्या वाढतीच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 12:30 AM2020-07-15T00:30:14+5:302020-07-15T00:30:35+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही महापालिका विविध नियम, अटींसह लॉकडाऊन वाढवत आहेत. ठाण्यात तर सलग लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
- स्नेहा पावसकर
ठाणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ठाणे महापालिका लागोपाठ लॉकडाऊन वाढवत आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. आता ठाण्यातील कपडे, ज्वेलरी, भांडी, कॉस्मेटिक्स, फर्निचर, हार्डवेअर, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींची दुकाने असलेल्या व्यापाऱ्यांनी, तसेच व्यापारी संघांनी लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान आणि वाढत्या समस्यांबाबत महापालिका प्रशासनाच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही महापालिका विविध नियम, अटींसह लॉकडाऊन वाढवत आहेत. ठाण्यात तर सलग लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग कमी होत नसून, उलट तो दिवसेंदिवस वाढत आहे. आमचा व्यवसाय मात्र यामुळे बुडाला आहे, अशा शब्दांत ठाण्यातील व्यापारी संघांनी मत व्यक्त केले आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदीव्यतिरिक्त इतर कोणतीही उपाययोजना पालिकेने केलेली नाही. केवळ दुकाने बंद करून काही होणार नाही. पहिल्या अनलॉकनंतर व्यापारी हळूहळू दुकाने सुरू करीत होते. मात्र पुन्हा लॉकडाऊन घेतल्याने आमचे नुकसान वाढत चालले आहे. दुकाने बंद असली तरी जागेचे भाडे द्यावे लागत आहे, पडून राहिलेल्या मालाचे नुकसान झाले आहे, कर्मचाºयांसह स्वत:चा वैयक्तिक खर्च करताना आमचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे याविषयी पालिकेने पुन्हा विचार करावा, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे.
पहिल्या अनलॉकमध्ये सम-विषम तारखेनुसार काही प्रमाणात आम्ही दुकाने सुरू केली होती. मात्र दुसºया अनलॉकमध्ये ठाण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन घेतला गेला. मात्र यातही नागरिक अत्यावश्यक सामानासाठी का होईना रस्त्यावर फिरत आहेत. अशाने कोरोना तर आटोक्यात येत नाहीच, परंतु आम्हा व्यापाºयांचे नुकसान वाढत आहे. लॉकडाऊनचा कोणताही निर्णय घेताना किमान महापालिका प्रशासनाने आम्हा व्यापाºयांना तरी विश्वासात घ्यायला हवे, असे मत ठाणे घोडबंदर रोड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पंकज जैन यांनी व्यक्त केले.
लॉकडाऊनचा परिणाम
संपूर्ण बाजारपेठेवर झाला आहे. व्यापाºयांसमोरही अनेक समस्या आहेत. दुकानात काम करणारे अनेक कर्मचारी गावी निघून गेले आहेत, तर जे आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. अशा कर्मचारी आणि व्यापाºयांसाठी सरकारने सहकार्य केले पाहिजे. लॉकडाऊन असाच वाढत राहिला तर कोरोनापेक्षा भुकेने मरणाºयांचे प्रमाण वाढेल, अशी भीती नौपाडा व्यापारी असोसिएशनचे मितेश शाह यांनी व्यक्त केली.
ठाण्यात लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून दुकाने बंद असल्यामुळे व्यापारी वर्गाची परिस्थितीही खालावली आहे. त्यामुळे आता यापुढे व्यवसाय बंद न ठेवता लॉकडाऊन करावा, अशी विनंती अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी शासनाकडे केली आहे. जर लॉकडाऊन करायचे असेल तर, सगळे व्यवहार बंद ठेवावेत, शुकशुकाट करावा, अशीदेखील मागणी त्यांनी केली.
ठाण्यात लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद करण्याच्या महापालिकेच्या आदेशाला राम मारुती रोडवरील व्यापाºयांनी तीव्र विरोध केला आहे. एकीकडे वाइन शॉपला होम डिलिव्हरीची परवानगी देताना, अन्य वस्तूंच्या व्यापाºयांनी गुन्हा केला आहे का, असा सवाल राम मारुती रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रसिक छेडा यांनी केला आहे. ठाणे महापालिकेने अचानक पुन्हा लॉकडाऊन लागू केल्याने व्यापाºयांना मोठा फटका बसला.