फेरीवाल्यांविरोधात व्यापारी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:53 PM2019-01-15T23:53:05+5:302019-01-15T23:53:15+5:30
पालिकेचे दुर्लक्ष : बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा
मीरा रोड : भार्इंदर पूर्व भागातील मुख्य रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर तक्रारी करुनही पालिका कारवाई करत नसल्याने भार्इंदर व्यापारी संघटनेने रहिवाशांसह २६ जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा लेखी इशारा पालिका आयुक्तांना दिला आहे.
भार्इंदर पूर्वेला नवघर मार्ग, तलाव मार्ग, बाळाराम पाटील मार्ग व रेल्वे स्थानक समांतर मार्ग हा बेकायदा फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे व्यापून गेला आहे. यात नव्याने वाढणाºया फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे. तर नव्याने वाढणाºया फेरीवाल्यांमागे बाजार वसुली करणारा सध्याच्या कंत्राटदाराचा हात असल्याचा आरोप भार्इंदर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गुर्जर यांनी केला.
फेरीवाले, बाजार वसुली कंत्राटदार व पालिका प्रशासनाचे संगनमत असल्याने ठोस व नियमित कारवाई केली जात नाही. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही रेल्वेस्थानक, शाळा - महाविद्यालय, रुग्णालय व धार्मिक स्थळांपासून दीडशे ते शंभर मीटरपर्यंत बसण्यास मनाई असतानाही फेरीवाले सर्रास तेथे बसतात. फेरीवाले वाढतील तेवढा जास्त फायदा बाजार वसुली कंत्राटदारास आहे. पालिकेला कारवाईसाठी सातत्याने निवेदने देऊनही प्रभाग समिती तीनचे प्रभाग अधिकारी व फेरीवाला निर्मूलन पथक कारवाईच करत नसल्याने नागरिकांना चालण्यासाठी रस्ते, पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. दुकानां समोर पदपथ, रस्त्यावर अतिक्रमण करुन बसणाºया फेरीवाल्यांमुळे स्वत:च्या जागेत सनदशीर मार्गाने आपला व्यवसाय करणाºया दुकानचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
फेरीवाल्यांना दिले जाणारे संरक्षण पाहता सामान्य व दुकानदार यांचे अतोनात हाल होत असल्याने उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
थातूरमातूर कारवाई केली जाते तलाव मार्ग येथील पालिका प्रभाग कार्यालयाबाहेर व्यापारी संघटना व स्थानिक रहिवाशांना घेऊन हे आंदोलन करणार असल्याचे गुर्जर म्हणाले. याआधी परिसरातील नगरसेवकांनी फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी करत प्रभाग अधिकारी दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. पण दोन दिवस थातूरमातूर कारवाई केल्यावर पालिका गप्प बसली असे गुर्जर म्हणाले.