दिवाळीत ठाणेकरांची घरे प्रकाशमान होणार पारंपरिक कंदिलांनी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:27 AM2018-10-25T00:27:06+5:302018-10-25T00:27:12+5:30
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. त्यानिमित्ताने घरांसमोरचा परिसर उजळून टाकणाऱ्या आकाशकंदिलांनी ठाण्यातील दुकाने, बाजारपेठा सजल्या आहेत.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. त्यानिमित्ताने घरांसमोरचा परिसर उजळून टाकणाऱ्या आकाशकंदिलांनी ठाण्यातील दुकाने, बाजारपेठा सजल्या आहेत. यंदाही पारंपरिक कंदिलांचाच तोरा दिसून येत आहे. यात आकर्षण ठरत आहे, तो प्रथमच बनवण्यात आलेला १० फुटांचा पारंपरिक दीपस्तंभ. यंदा नव्याने तयार करण्यात आलेले पेपरचे बॉल्स, षटकोन झुमर, पॅराशूट झुमरदेखील ठाणेकरांच्या घरांसमोर दिसणार आहे.
दिवाळी निमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. ठिकठिकाणी कंदिलांव्यतिरिक्त रांगोळी, उटणे, पणत्या, फराळांची विक्री सुरू झाली आहे. ठाणेकरांना आकर्षित करण्यासाठी नवीन प्रकारांचे कंदील आले आहेत. पारंपरिक कंदिलांमध्ये चारकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन, मटकी हे प्रकार पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा पारंपरिक कंदिलांनाच मागणी आहे. आम्ही कंदिलांमध्ये चायना मार्केट बंद केले. गल्लीबोळांत पारंपरिक कंदील दिसणे, हा उद्देश आहे, असे हस्तकलाकार कैलाश देसले यांनी सांगितले.
>फ्लोरोसेंट कलरच्या कंदिलांची भुरळ
कंदिलांमध्ये यंदा फ्लोरोसेंट कलर पाहायला मिळत आहे. या रंगांच्या कंदिलांनी ठाणेकरांना भुरळ घातली आहे. मल्टिमिक्स रंगांचे कंदीलही विक्रीसाठी आहेत. कपडा, बांबू, लाकडाच्या पट्ट्या यापासून बनवलेल्या १० फुटांच्या पारंपरिक दीपस्तंभालाही ठाणेकरांनी पसंती दिली आहे.
परदेशातही गेले पारंपरिक कंदील
ठाणेकरांप्रमाणे परदेशी नागरिकांनीही पारंपरिक कंदिलांना पसंती दिली आहे. सिंगापूर, अमेरिका, आॅस्ट्रेलिया यासारख्या देशांत पारंपरिक तसेच बांबूचे कंदील परदेशात गेले आहेत.
>दिव्यांगही गुंतलेत कंदील बनवण्यात
दिव्यांगांच्या हातांना काम मिळावे, यासाठी देसले त्यांना कामात सहभागी करून घेतात. विविध कंदील बनवण्यात १0 दिव्यांगांचे हात गुंतले आहेत. याशिवाय तीन इंचांपासून सहा इंचांचे छोटे कंदीलही विक्रीसाठी आहेत. सोसायट्यांनी एकसारख्या कंदिलांचे बुकिंग केले आहे.