मेट्रोच्या कामामुळे द्रुतगतीसह घोडबंदर मार्गावर वाहतूक बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:46 AM2021-09-05T04:46:36+5:302021-09-05T04:46:36+5:30
ठाणे : मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर तसेच द्रुतगती महामार्गावर आता वाहतूक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील ...
ठाणे : मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर तसेच द्रुतगती महामार्गावर आता वाहतूक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील नितीन कंपनी येथे आणि घोडबंदर येथील कापूरबावडी ते कासारवडवली मार्गावर तुळई उभारली जाणार आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर सोमवारपर्यंत आणि घोडबंदर मार्गावर मंगळवारपर्यंत वाहतूक बदल लागू केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेने दिली. रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळेत हे बदल लागू असणार आहेत.
मेट्रो मार्गिकेवर खांबांची उभारणी झाली असून, मार्गिकांवर तुळई उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी रविवार ते मंगळवारी रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी एमएमआरडीएकडून कामे केली जाणार आहेत.
द्रुतगती महामार्गावरील बदल-
रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत आणि रविवारी रात्री ११.४५ ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत लागू असेल. मुंबईहून नितीन कंपनी उड्डाणपुलावर जाणाऱ्या वाहनांना मुख्य मार्गावरून प्रवेशबंदी केली आहे. येथील वाहने एलआयसी जंक्शन येथून सेवा रस्त्यावरून पुढे जाऊ शकतील.
घोडबंदर मार्गावरील बदल
रविवारी ते मंगळवार या दिवशी दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कापूरबावडी येथील तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील अवजड वाहने कापूरबावडी येथून उजवीकडे वळण घेऊन बाळकूम, काल्हेर, अंजूर फाटामार्गे किंवा माजीवडा उड्डाणपुलाखालून खारेगावच्या दिशेने जातील, तर हलक्या वाहनांना तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील सेवा रस्त्याने घोडबंदरच्या दिशेने जाण्यास परवानगी असेल किंवा पोखरण रोड दोन, गांधीनगर, वसंतविहार, खेवरा चौकमार्गे जाता येईल.