भारत जोडो न्याय यात्रे निमित्ताने ठाणे शहरात वाहतूक बदल, काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाण्यात येणार
By अजित मांडके | Published: March 15, 2024 03:54 PM2024-03-15T15:54:20+5:302024-03-15T15:54:41+5:30
भिवंडी नंतर आता शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाण्यात येत आहे. त्यांची यात्रा शहरातील विविध भागातून जाणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीची शक्यता र्वतविली जात आहे. त्या अनुषंगाने ठाणे वाहतुक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदल लागू केले आहेत.
ठाणे : भिवंडी नंतर आता शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाण्यात येत आहे. त्यांची यात्रा शहरातील विविध भागातून जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता र्वतविली जात आहे. त्या अनुषंगाने ठाणे वाहतुक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुक बदल लागू केले आहेत. हे वाहतूक बदल शनिवारी सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत लागू असणार असल्याची माहिती ठाणे वाहतुक विभागाने दिली आहे.
हरिनिवास चौक येथून टेलिफोन नाका किंवा गोखले रोडच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना नौपाडा पोलीस ठाण्याजवळ प्रवेशबंद असेल. येथील वाहने संत तुकाराम महाराज उड्डाणपुलावरून ब्राह्मण सोसायटी मार्गे वाहतुक करतील.
गोखले रोड मार्गावरील समर्थ भंडार येथून तीन हात नाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या हलक्या वाहनांना समर्थ भंडार येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने बी- केबिन, ब्राह्मण सोसायटी मार्गे वाहतुक करतील. तर जड किंवा मोठी वाहने गावदेवी मार्गे वाहतूक करतील.
तीन हात नाका येथून समर्थ भंडारच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना रघुवेल उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने एसबीएस रोड, हरिनिवास चौक, तीन पेट्रोल पंप येथून वाहतुक करतील. कोर्टनाका येथून ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाºया वाहनांना जीपीओ जवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह, क्रिकनाका, दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह येथून वाहतुक करतील.
ठाणे रेल्वे स्थानक येथून टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या बसगाड्या आणि इतर वाहनांना मुस चौकात प्रवेशबंदी असेल. बसगाड्या सॅटीस पूलावरून बी-केबिन, गोखले रोड मार्गे वाहतुक करतील. तर हलकी वाहने मुस चौकातून डावे वळण घेऊन वाहतुक करतील.
राम मारूती रोड, गोखले रोडच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना पु.ना. गाडगीळ चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तीन पेट्रोल पंप किंवा गडकरी चौक, चिंतामणी चौक मार्गे वाहतुक करतील. कळवा येथून क्रिकनाका मार्गे कोर्टनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह, जीपीओ मार्गे वाहतुक करतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि उथळसर येथून टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने जिल्हा शासकीय रुग्णालय चौकातून जीपीओ, कोर्टनाका, जांभळीनाका मार्गे वाहतुक करतील.
मासुंदा तलाव, गडकरी रंगातन नाट्यगृह येथून मुस चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने दगडी शाळा, गजानन महाराज चौक तसेच अल्मेडा चौक मार्गे वाहतुक करतील.
नवी मुंबई येथून विटावा, कळवा येथून वाहतुक करणाऱ्या वाहनांना पटणी येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ऐरोली खाडी पूल मार्गे वाहतुक करतील.
मुंब्रा, पारसिरकनगर येथून कळवा येथे वाहतुक करणाºया वाहनांना पारसिक चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने पारसिक चौक, गॅमन जंक्शन, खारेगाव टोलनाका मार्गे वाहतूक करतील.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन येथून ठाणे, कळवा पूल मार्गे नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कॅडबरी सिग्नल येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कोपरी, ऐरोली मार्गे वाहतुक करतील.
येथे वाहने उभी करण्यास बंदी
गोखले रोड, कोर्टनाका ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शिवाजी महाराज पथ, अग्यारी मार्ग, मासुंदा तलाव, कळवा येथील पारसिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळवा नाका परिसरात वाहने उभी करण्यास बंदी असेल.