वाहतूक कोंडीचा जाच सुरूच; साकेत ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा
By अजित मांडके | Published: July 19, 2022 11:53 AM2022-07-19T11:53:54+5:302022-07-19T11:54:53+5:30
मंगळवारी पहाटेपासूनच पुन्हा वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला.
अजित मांडके
ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत, खारेगाव टोलनाका भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी रात्री साकेत पूल ते मुंबईतील मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर मंगळवारी पहाटेपासूनच पुन्हा वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि चाकरमान्यांनादेखील याचा फटका बसला. ही वाहतूक कोंडी तीन हात नाक्यापर्यंत तर दुसऱ्या बाजूने घोडबंदर पर्यंत गेली होती. या वाहतूक कुंडीचा फटका अंतर्गत रस्त्यांना देखील बसल्याचे दिसून आले.
या वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून ठाणे, घोडबदंर, कल्याण, भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. अनेक अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसह रुग्णवाहिका, खासगी कंपन्यांच्या बसगाड्या, बेस्ट आणि टीएमटीच्या बसगाड्या, कार आणि दुचाकी या वाहतूक कोंडीमध्ये अडकून होत्या. अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना दोन तास लागत होते. त्यात सकाळी कपुरबावड़ी येथे ट्रक बंद पडल्याने या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली. त्यामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना याचा फटका बसला. अनेक ठिकाणी ठाणेकर नागरिक वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत होते.
ठाणे - मागील आठवड्यात ज्या प्रमाणे वाहतूककोंडी निर्माण झाली होती अशीच कोंडी आजदेखील निर्माण झाली आहे. चार तासांपासून ३ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. आता धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे.
— Lokmat (@lokmat) July 19, 2022
Video : विशाल हळदे
लोकमत #Thanepic.twitter.com/208cgHnGCI
मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूल आणि खारेगाव टोलनाका भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शनिवारी आणि रविवारी राज्य रस्ते विकास महामंडळाने या भागात खड्ड्यांवर खडी टाकून खड्डे बुजविले होते. परंतु सोमवारी दुपारी पडलेल्या पावसामुळे खडी वाहून गेली. त्यामुळे पुन्हा या मार्गावर खड्डे पडले. त्यामुळे सोमवारी दुपारपासूनच शहरात वाहतूक कोंडीस सुरूवात झाली होती. मंगळवारी सकाळी मुंबईत कामानिमित्ताने जाणारे नोकरदार घरी परतत होते. मुलुंड टोलनाका, कोपरी पूलमार्गे ठाणे, घोडबंदर, भिवंडी, कल्याण आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करत असतात. परंतु वाहनांचा भार वाढून या मार्गावर साकेत पूल ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तसेच साकेत ते घोडबंदर पातलीपाडा पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये सेवा रस्ते ही जाम झाले होते. दुसरीकडे कापूरवाडी ते ढोकाळी ब्रह्मांड या मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली होती.
माजिवडा जंक्शनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका, खासगी कंपन्यांच्या बसगाड्या, बेस्ट आणि टीएमटीच्या बसगाड्या, शेकडो कार आणि दुचाकी या वाहतूक कोंडीत अडकून होत्या. कासवगतीने या वाहनांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे एक ते दीड तास लागत होता. या वाहतूक कोंडीमुळे महिला नोकरदारांचे सर्वाधिक हाल झाले.