वाहतूककोंडीने भिवंडीकर झाले त्रस्त; चालणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:45 AM2019-07-27T00:45:25+5:302019-07-27T00:46:11+5:30
वाहतूक पोलीस गायब, ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य
भिवंडी : भिवंडी परिसरात वाहतुकीचे पोलिसांकडून नियोजन होत नसल्यामुळे कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वंजारपट्टीनाका ते कल्याण रोड, धामणकरनाका येथे रिक्षातून जाण्यासाठी तासभर लागतो.
मंडई, नझराना, शांतीनगर, भंडारी चौक, अंजूरफाटा, मिरॅकल मॉल, कोटरगेट मशीद आदी विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चक्क नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. शहरात रोजच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पोलिसांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळे निर्माण झाल्याने वाहने खड्ड्यांमध्ये पडून बंद पडत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारही घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस व महापालिका प्रशासनामध्ये योग्य समन्वय नसल्याने शहरातील विविध भागांत वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवर व चौकांत वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र, प्रत्यक्षात जागेवर वाहतूक पोलीस नसल्यामुळे कोंडीत भर पडत आहे.
रिक्षाचालकांना शिस्त लावणे गरजेचे
रिक्षाचालक आनंद दिघे चौक, इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार, भिवंडी एसटी स्टॅण्ड चौक, वंजारपट्टीनाका, तीनबत्ती चौक, प्रभुआळी, मंडई, धामणकरनाका, कासारआळी, ठाणगेआळी, पारनाका बाजारपेठ अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर रिक्षाचालक कशाही रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. तहसील कार्यालय, अशोकनगर, कल्याण रोड, अंजूरफाटा, धामणकरनाका, भादवडनाका, गौरीपाडा, पारनाका, ब्राह्मणआळी, नझराना रोड आदी ठिकाणी रोज कोंडी होते.