डोंबिवलीत सकाळी रेल्वे स्थानक परिसरात वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:45 AM2021-08-12T04:45:03+5:302021-08-12T04:45:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरातील रामनगर आणि पाटकर रस्त्यावर सकाळच्या वेळी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे ...

Traffic congestion in the morning near Dombivali railway station | डोंबिवलीत सकाळी रेल्वे स्थानक परिसरात वाहतूककोंडी

डोंबिवलीत सकाळी रेल्वे स्थानक परिसरात वाहतूककोंडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरातील रामनगर आणि पाटकर रस्त्यावर सकाळच्या वेळी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे लोकल गाठण्यासाठी घाईत असणारे नोकरदार मेटाकुटीला आले आहेत. रामनगरमध्ये वाहतूक नियंत्रण कक्षासमोरच बेशिस्त रिक्षाचालक रिक्षा कशाही उभ्या करतात. त्यातच नोकरदार आपली दुचाकी घेऊन थेट स्थानकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असल्याने कोंडीत भर पडते. त्यामुळे सकाळच्या वेळी वाहतूक पोलीस नेमून या रिक्षाचालकांना चाप लावावा, अशी मागणी नोकरदारांकडून होत आहे.

रेल्वे स्थानकाबाहेर रामनगर आणि पाटकर रस्त्यावर रिक्षा स्टॅण्ड आहे. सकाळी शहरातील विविध भागांतून नोकरदार रिक्षाने रेल्वे स्थानक गाठतात, तर काही जण दुचाकी, चारचाकींनी येथे येतात. रामनगरमध्ये वाहूतक पोलीस नियंत्रण कक्षासमोरच रिक्षाचालक अडव्या-तिडव्या रिक्षा उभ्या करतात. प्रत्येकाला घाई असल्याने कोणी थांबायला तयार नसतो. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. त्यावर वाहतूक नियंत्रण शाखेचा वचक नाही, अशी टीका नोकरदारांनी केली. स्वामी विवेकानंद रस्ता ते केळकर रस्त्यापर्यंत मंगळवारी सकाळी रिक्षांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानकापर्यंत आलेल्या रिक्षांना माघारी फिरण्यासाठी यु टर्न घेणे अवघड झाले होते. त्यात काहींनी कोंडी टाळण्यासाठी केळकर रस्त्यावर यु टर्न घेण्याचा प्रयत्न केला, पण दुतर्फा वाहने असल्याने तो प्रयत्न फसला. परिणामी रस्ता आणखी जाम झाला. त्यामुळे लोकल पकडण्यासाठी घाईत असलेल्या नोकरदारांना स्थानक गाठताना नाकीनऊ आले. अनेक जण केळकर रस्त्यावर रिक्षातून उतरून उर्सेकर वाडीतून स्थानकात गेले. मात्र, यात वेळ वाया गेला, तर काहींची लोकल चुकल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

-----------

सकाळच्या वेळेत रामनगर, पाटकर आदी ठिकाणी कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस कर्मचारी नेमला जातो. पण मंगळवारी दोघे जण आजारी पडले. त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनाअभावी समस्या निर्माण झाली. राथ रोडवर नोकरदार, प्रवाशांची ही गैरसोय लक्षात येताच ती सोडवली. त्याकरिता कोंडी सोडवण्यावर जास्त भर दिला.

- उमेश गित्ते, प्रभारी पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, डोंबिवली

------------

Web Title: Traffic congestion in the morning near Dombivali railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.