भिवंडी ठाणे महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:56 AM2021-02-26T04:56:36+5:302021-02-26T04:56:36+5:30
ठाणे-भिवंडी महामार्गावर मोठा गोदाम पट्टा असल्याने या भागात वाहनांची नेहमी ये-जा असते. भिवंडीतील कानाकोपऱ्यातून नागरिक रोजगारासाठी या मार्गावरून रोज ...
ठाणे-भिवंडी महामार्गावर मोठा गोदाम पट्टा असल्याने या भागात वाहनांची नेहमी ये-जा असते. भिवंडीतील कानाकोपऱ्यातून नागरिक रोजगारासाठी या मार्गावरून रोज प्रवास करत असतात. त्यातच आता शाळा सुरू असल्याने या कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनादेखील बसत आहे. अनलॉकनंतर या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्याच्या मध्यभागी एमएमआरडीए प्राधिकरणाने मेट्रो ट्रेनचे काम हाती घेतले आहे. मात्र हे काम करण्याआधी अतिक्रमणे हटविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मार्गावर कोंडी होत आहे. कशेळी, काल्हेर, पूर्णा, राहणाल येथे जाणाऱ्या कामगारांना, तसेच भिवंडी, ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या समस्येला सामोरे जावे लागते. याशिवाय रस्त्यावर स्थानिक नागरिक, तसेच व्यावसायिक आपली वाहने उभी करून ठेवत असल्यानेही वाहतूककोंडीत भर पडते.
..........................
रस्त्याची अवस्था दयनीय
काल्हेर ते राहनाळ या भागात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या भागात गटार व्यवस्थापन नसल्याने गटाराचे पाणी महामार्गावर येत असल्याने चिखलमिश्रित गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो. या चिखलमिश्रित पाण्यात दुचाकीस्वार घसरून पडल्याने अनेक अपघात या ठिकाणी होतात.