वाहतूक कोंडी झाली कमी: मुंबईत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस फे-या वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:41 PM2020-06-09T23:41:08+5:302020-06-09T23:53:10+5:30
अनलॉकच्या दुस-या दिवशी ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे दुस-या दिवशी वाहतूक कोंडी फुटली. मुंबईत जाणा-या चाकरमान्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवाच उपलब्ध नाही. त्यात बससेवाही अपु-या संख्येने आहे. त्यामुळे मुंबईत जाण्यासाठी बेस्ट, एसटी आणि टीएमटीच्या बस फे-यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि शहापूर भागातून मुंबईतील शासकीय, निमशासकीय किंवा खासगी कार्यालय गाठण्यासाठी कर्मचा-यांची मंगळवारीही मोठी तारांबळ उडाली. वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे दुस-या दिवशी वाहतूक कोंडी फुटली. पण सार्वजनिक उपक्रमातील बसेसची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
रेल्वेची उपनगरी सेवा (लोकल) सुरु नसल्यामुळे सोमवारी पहिल्याच दिवशी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर तसेच ठाणे शहरातून आपले मुंबईतील कार्यालय गाठण्यासाठी खासगी वाहनांचा आसरा घेतला. मात्र, दुचाकीवर केवळ चालक, मोटारकार आणि रिक्षामध्ये चालकासह तिघांना परवानगी असल्यामुळे रस्त्यावर खासगी वाहनांची संख्या मोठया प्रमाणात रस्त्यावर वाढली. तरीही, ९ जून रोजी ठाण्यातून मुुंबईकडे जाणा-या वाहनांचे कोपरी, नौपाडा, ठाणेनगर आणि वागळे इस्टेट या वाहतूक शाखेच्या युनिटने योग्य नियोजन केले. त्यामुळे सकाळी ७ ते ११ या काळात मुंबईकडे जाणा-या वाहनांची गर्दी फारशी झाली नाही. परंतू, मुंबईतील शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचा-यांची दहा टक्के उपस्थिती अनिवार्य असल्यामुळे अत्यावश्यक सेवांसह या कर्मचाºयांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुंबई परिवहन सेवेच्या बेस्ट उपक्रमासह, ठाणे परिवहन सेवा आणि राज्य परिवहन सेवांच्या बस फेºया या कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि ठाणे शहर या भागातून मोठया प्रमाणात वाढविण्यात याव्यात. तरच खासगी वाहनांवरील भार हा काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.