वाहतूककोंडी, लूटमार, हाल अन् मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:28 AM2019-12-26T00:28:57+5:302019-12-26T00:35:21+5:30
मध्य रेल्वेने बुधवारी घेतलेल्या ब्लॉकच्या काळात रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून मनमानी करत जादा भाडे
कल्याण/ डोंबिवली : ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याकरिता मध्य रेल्वेने बुधवारी घेतलेल्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे कल्याण-डोंबिवलीची अक्षरश: कोंडी झाली. कल्याण-डोंबिवलीदरम्यान लोकल बंद राहिल्या. तर, डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेला नियोजनाप्रमाणे वेळेत लोकल न धावल्याने डोंबिवली व दिवा स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. सकाळच्या वेळेत प्लॅटफॉर्म, जिने व रेल्वे स्थानक परिसर प्रवाशांनी तुडुंब भरलेले होते. दुसरीकडे रिक्षाचालकांनी प्रवाशांच्या या अडचणींचा गैरफायदा घेत मनमानीपणे भाडेवसुली केल्याने त्याचा प्रचंड मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. केडीएमटीने सोडलेल्या जादा बसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला, तरी ही सेवा तुलनेत तोकडी होती. रस्त्यांवर अचानक वाहने वाढल्याने झालेल्या वाहतूककोंडीत केडीएमटीच्या दोन बस बंद पडल्या. त्यामुळे महिला व मुलांना प्रवास नकोसा झाला. एकूणच प्रवाशांची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे प्रवासी हतबल; यंत्रणांचे दुर्लक्ष
प्रशांत माने
डोंबिवली : मध्य रेल्वेने बुधवारी घेतलेल्या ब्लॉकच्या काळात रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून मनमानी करत जादा भाडे आकारल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रिक्षाचालकांच्या या मनमानीप्रकरणी ठोस कारवाई अपेक्षित असताना त्याकडे कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
ब्लॉकच्या कालावधीत कल्याण-डोंबिवलीदरम्यान एकही लोकल धावली नाही. मात्र, या काळात कल्याणहून कर्जत-कसाऱ्याकडे आणि डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे लोकल सोडण्यात आल्या. कल्याण-डोंबिवलीला येजा करण्यासाठी केडीएमटीने विशेष बस सोडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी बससेवेचा आधार घेतला. तर, काहींनी गर्दीमुळे रिक्षाने इच्छितस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षाचालकांनी त्यांच्याकडून अव्वाच्यासव्वा भाडे घेतले.
रेल्वेचा एखादा ब्लॉक असो अथवा ठप्प पडलेली रेल्वे वाहतूक, या परिस्थितीचा रिक्षाचालकांकडून नेहमीच गैरफायदा घेतला जातो. मनमानी भाडे आकारून प्रवाशांची सर्रासपणे त्यांच्याकडून आर्थिक पिळवणूक केली जाते. यासंदर्भात कोकण रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी प्रवाशांना त्रास होणार नाही, यासंदर्भात रिक्षाचालकांना सूचना केल्या जातील, असे सांगितले होते. परंतु, बुधवारी रिक्षाचालकांनी मनमानी भाडे आकारल्याने ती त्यांची प्रवृत्तीच असल्याची तिखट प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. चार तासांच्या रेल्वेच्या ब्लॉकमध्ये केडीएमटीने नेहमीप्रमाणे १० रुपये आकारले असताना डोंबिवलीत रिक्षाचालकांकडून शेअरसाठी प्रतिप्रवासी ५० रुपये भाडे आकारले जात होते. मीटरप्रमाणे भाडे आकारण्याची मागणी केली असता १५० ते २०० रुपये भाडे द्यावे लागेल, असे सांगितले जात होते. कल्याणमध्येही रिक्षाचालकांकडून जादा भाडे आकारले जात होते. कल्याण ते डोंबिवलीसाठी ७५ ते १०० रुपये तर, कल्याण ते ठाण्यासाठी १५० ते २०० रुपये भाडे आकारत प्रवाशांची पिळवणूक केल्याचेही दिसून आले.
दरम्यान, याप्रकरणी आरटीओ आणि वाहतूक शाखेशी संपर्क साधला असता यासंदर्भात कोणाच्याही तक्रारी नसल्याचे सांगत एक प्रकारे रिक्षाचालकांच्या मनमानीला अभय दिल्याचे स्पष्ट झाले. तर, रिक्षा संघटनांनीही रिक्षाचालकांना पाठीशी घातले असून वाहतूककोंडीमुळे तासन्तास रिक्षा अडकून पडल्याने जादा भाडे आकारले गेले असावे, असा तर्क त्यांच्याकडून लावण्यात आला आहे.
बस बंद पडल्याने वाहतूककोंडी; पोलिसांच्या नाकीनऊ
केडीएमटीच्या बस उपलब्ध केल्या गेल्या होत्या, परंतु यातील दोन बस नादुरुस्त होऊन जागेवरच बंद पडल्याने डोंबिवली पूर्वेतील पी.पी. चेंबर आणि कल्याण पत्रीपुलाकडून डोंबिवलीच्या दिशेला जाणाºया मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीचा सामना वाहनचालक आणि पादचाऱ्यांना करावा लागला. ठाकुर्ली स्थानकात गर्डर टाकण्यात येणार होते. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविली होती. यात ठाकुर्ली पूर्व-पश्चिम जोडणाºया उड्डाणपुलाच्या परिसरातील रस्तेही वाहतूककोंडीने ब्लॉक झाले होते. कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावरही हाच प्रकार पाहायला मिळाला. क्रीडासंकुलासमोरील रस्ता खोदल्याने त्याचा फटकाही वाहतुकीला बसला. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा, टिळक चौक, घरडा सर्कल ते खंबाळपाडा मार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. पत्रीपुलानजीक वाहतुकीचा उडालेला बोजवारा पाहता केडीएमटीच्या बस कल्याणकडे मार्गस्थ करताना वालधुनी उड्डाणपूलमार्गे वळविण्यात आल्या होत्या. पश्चिमेकडील दुर्गामाता चौकातही मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात रिक्षांची झालेली दाटी आणि केडीएमटीच्या बसच्या वाढलेल्या पसाºयाने फडके रोडवर वाहतूक जॅम झाल्याचे पाहायला मिळाले. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या अक्षरश: नाकीनऊ आले होते. पी.पी. चेंबर परिसरात केडीएमटीची बस बंद पडल्याने तेथील वाहतूक मानपाडा चाररस्तामार्गे डावीकडून कल्याणच्या दिशेला वळविली होती.
...तर अधिक चांगले नियोजन करता आले असते
रेल्वे प्रशासनाकडून एक दिवस आधी गर्डरच्या कामानिमित्त ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. बुधवारी नाताळच्या सुटीचे औचित्य साधत चार तासांचा विशेष ब्लॉक घेतला असला तरी याबाबतची माहिती चार ते पाच दिवस आधी मिळाली असती, तर चांगल्या प्रकारे नियोजन करता आले असते, जेणेकरून प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर झाला असता, अशी चर्चा केडीएमटीचे पदाधिकारी आणि अधिकाºयांमध्ये सुरू होती.
तुडुंब बसमध्ये महिला, मुलांचे अतोनात हाल
च्केडीएमटीने चालविलेल्या बससेवेचा लाभ प्रवाशांनी घेतला. मात्र, नेहमीपेक्षा बसमध्ये जास्त गर्दी झाल्याने तसेच वाहतूक कोंडीत बस अडकल्याने याचा त्रास बसमध्ये बसलेल्या महिला आणि लहान मुलांना झाल्याचे पाहायला मिळाले.
च्कल्याण येथून केडीएमटी बसने डोंबिवलीला जात असताना रस्त्यातील वाहतूककोंडीमुळे बसमधील प्रवाशांना त्रास झाला. प्रवासासाठी ४० ते ४५ मिनिटे लागली. पण, हा प्रवास खूपच त्रासदायक होता. यात जास्तकरून महिला आणि मुलांना याचा जास्त त्रास झाला, अशी प्रतिक्रिया प्रवासी शशिकांत
कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
च्वाहतूककोंडीमुळे बस आलेली नाही. अर्ध्या तासापासून वाट पाहत आहोत आॅफिसला जायला लेट झाला असून आॅफिसमधून ओरडा बसल्याचे महिला प्रवासी यू. पद्मावती यांनी सांगितले. तर, उल्हासनगरला रुग्णालयात जायचे आहे. १२ वाजताची डॉक्टरची वेळ घेतली आहे. परंतु, बस वेळेवर न आल्याने अपॉइंटमेंट रद्द होण्याची शक्यता असल्याची भीती प्रवासी दीपिका भुवड यांनी व्यक्त केली.