अपघातामुळे ठाण्यात वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:50+5:302021-06-09T04:49:50+5:30
ठाणे : पाठीमागून आलेल्या ट्रकच्या धडकेने पुढचा ट्रक रस्त्यावर मधोमध उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नितीन कंपनी ...
ठाणे : पाठीमागून आलेल्या ट्रकच्या धडकेने पुढचा ट्रक रस्त्यावर मधोमध उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नितीन कंपनी उड्डाणपुलावर घडली. त्याचवेळी ट्रकमधील ऑइलही रस्त्यावर पसरल्यामुळे ठाण्यातील मुंबई - नाशिक महामार्गावर सकाळीच मोठी वाहतूककोंडी झाली होती. या अपघातात किशोर (३०) आणि रफीक शेख (२५) हे दोघे जखमी झाले असून, त्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.
ट्रकचालक किशोर (३०) हा रिकामा ट्रक घेऊन ठाण्यातून भिवंडीकडे जात होता. हा ट्रक नितीन कंपनी उड्डाणपुलावरून जात असताना, ठाण्यातून वसईकडे जाण्यासाठी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या रफिक शेख याच्या ट्रकने किशोरच्या ट्रकला धडक दिली. हा अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, किशोरचा ट्रक पुढे जाऊन रस्त्याच्या मधोमध जाऊन उलटला. याचदरम्यान ट्रकमधील ऑइल आणि डिझेल रस्त्यावर पसरले. रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्याने तसेच ऑइलही पसरल्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली. ही माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाले होते. भिवंडीतील जखमी चालक किशोरच्या डोक्याला तर नालासोपारा येथील रफिकच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने ठामपाच्या कळवा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर उलटलेला ट्रकही क्रेनच्या मदतीने बाजूला केला.
रस्त्यावरील ऑइलमुळे वाहने घसरू नयेत, म्हणून त्याठिकाणी पाण्याचा मारा करून सफाई केली. यादरम्यान मुंबई येथून ठाणे मार्गे नाशिककडे जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेवरून धीम्या गतीने सुरू ठेवली होती. एकाच मार्गिकेवर काही काळ वाहतूक वळविण्यात आल्याने सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठाण्यात वाहतूककोंडीचे चित्र निर्माण झाले होते. सकाळी ८.३० वाजेनंतर ती सुरळीत झाल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.