मुंब्रा बायपासवर उलटलेल्या कंटेनरमुळे ठाण्यात वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:00 PM2021-02-25T23:00:10+5:302021-02-25T23:00:33+5:30

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवर उलटलेल्या कंटेनरने ठाणे शहरात गुरुवारी सकाळी वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या अपघातामुळे शहरात वाहतुकीवर परिणाम ...

Traffic congestion in Thane due to overturned container on Mumbra bypass | मुंब्रा बायपासवर उलटलेल्या कंटेनरमुळे ठाण्यात वाहतूककोंडी

मुंब्रा बायपासवर उलटलेल्या कंटेनरमुळे ठाण्यात वाहतूककोंडी

Next

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवर उलटलेल्या कंटेनरने ठाणे शहरात गुरुवारी सकाळी वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या अपघातामुळे शहरात वाहतुकीवर परिणाम होऊन मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना या कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्याच्या मधोमध उलटलेला कंटेनर हलवण्यासाठी तीन हायड्रा क्रेनची मदत घेण्यात आली. सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास कंटेनर हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.

मुंब्रा बायपास रोडवरील हॉटेल लाल किल्ल्याजवळ बुधवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर उलटून रस्त्याच्या मधोमध आडवा झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तरी मुंब्रा बायपास रोडवर मोठी वाहतूककोंडी झाली. ही कोंडी सकाळपर्यंत ठाण्यापर्यंत पोहोचून, शहरातही वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी कामानिमित्त वाहने घेऊन बाहेर पडलेले चाकरमानी या कोंडीत अडकून पडले. तीन हायड्रा क्रेनच्या मदतीने कंटेनर हलवल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्र असल्याने कंटेनर हलवता आला नाही. सकाळ होताच कंटेनर हलविण्याचे काम हाती घेण्यात आले. याचदरम्यान या अपघातामुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांसह शहरातून बाहेर जाणाऱ्या, तसेच ठाण्याकडून पनवेलकडे जाणारी वाहतूक खोळंबली. परिणामी नाशिकहून मुंबईकडे, तसेच घोडबंदरहून ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवर वाहतूककोंडी झाली.

अपघातग्रस्त कंटेनर हा ठाण्यातून जेएनपीटीकडे जात होता. बायपासवर कंटेनरचा टायर फुटला आणि तो ठाण्याकडून जाणाऱ्या वाहिनीवर मधोमध उलटला. बायपासवरील ठाण्याकडे येणारी वाहिनी सुरळीत सुरू असल्याने त्या वाहिनीवर कोंडी झाली नव्हती. कंटेनर उचलण्यास सुरू केल्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली. कंटनेर उचलून बाजूला करण्यास दहा ते साडेदहा वाजले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
    - बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

२४ तासांत दुसरी घटना
बुधवारी दुपारी तळोजाहून भिवंडीकडे निघालेला ट्रक मुंब्रा बायपासवरील मुंब्रादेवी रोडच्या कडेला उलटला. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून हा ट्रक जेवणासाठी लागणाऱ्या तेलाच्या बॅगने भरला होता. बायपास रोडवरील २४ तासांमधील ही दुसरी घटना आहे. दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एमएमआरडीएकडे वर्ग करण्याची गरज

येथील बायपासवर बहुतांश ठिकाणी गतिरोधक नाहीत. जे आहेत ते सुस्थितीत नाहीत. त्यामुळे असमतोल झालेल्या या रस्त्यावर वाहनचालकाचे संतुलन बिघडून अपघाताच्या घटना नेहमी घडत आहेत. ठराविक दिवसांनी घडत असलेल्या या घटनांना आळा बसावा, यासाठी रस्त्याची व्यवस्थित डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. देखभालीसाठी हा रस्ता एमएमआरडीएकडे वर्ग करण्याची मागणी मुंब्रा (उपविभाग) वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.  

Web Title: Traffic congestion in Thane due to overturned container on Mumbra bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.