वाहतूक नियंत्रण शाखेला मिळणार आणखी २० वॉर्डन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:15 AM2019-09-20T01:15:47+5:302019-09-20T01:15:55+5:30

केडीएमसी हद्दीतील रस्त्यांवरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने आणखी २० ट्रॅफिक वॉर्डन देण्याची मागणी वाहतूक नियंत्रण शाखेने महापालिकेकडे केली होती.

Traffic Control Branch will get 5 more wardens | वाहतूक नियंत्रण शाखेला मिळणार आणखी २० वॉर्डन

वाहतूक नियंत्रण शाखेला मिळणार आणखी २० वॉर्डन

Next

कल्याण : केडीएमसी हद्दीतील रस्त्यांवरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने आणखी २० ट्रॅफिक वॉर्डन देण्याची मागणी वाहतूक नियंत्रण शाखेने महापालिकेकडे केली होती. महापालिकेच्या गुरुवारी पार झालेल्या महासभेत ही मागणी मंजूर करण्यात आली.
ट्रॅफिक वॉर्डन देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला असता भाजप सदस्य राहुल दामले यांनी महापालिकेने यापूर्वी किती वॉर्डन नेमले आहेत? ते काम करत नसल्याने शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा आढावा घ्यावा. त्याशिवाय, नव्याने वॉर्डन नेमण्यास मंजुरी देऊ नये, असा मुद्दा मांडला. तसेच वॉर्डन नेमण्याचा जो हेतू होता, त्याला हरताळ फासला जात आहे. त्याचे कारण हे वॉर्डन वाहतूककोंडी दूर करण्याचे काम न करता अन्य ठिकाणी वसुली करण्याचे काम करतात. वाहतूक पोलिसांचे वॉर्डन हस्तक झाले आहेत, असा आरोप दामले यांनी केला आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी ज्या काही गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता असते, त्या गोष्टींसाठी महापालिका तत्पर असते. त्यानुसार, वाहतूक शाखेकडून जी काही मागणी केली जाते, त्याची पूर्तता केली जाते. जॅमर पुरविले जातात. मात्र, वाहतूक शाखा केवळ महापालिकेची मदत घेते. प्रत्यक्षात वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक नियंत्रणाचे काम केले जात नाही. जनतेच्या नाराजीला सदस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आधी नेमलेल्या वॉर्डनकडून काम केले जात नसताना नवीन वॉर्डन नेमण्याचे कारण काय? वॉर्डन नेमण्यास विरोध नसला तरी उद्देश साध्य केला जात नसल्यास वॉर्डनची नेमणूक कशासाठी करायची, असा सवाल दामले यांनी केला. दामले यांचा विरोध पाहता भाजप सदस्य शैलेश धात्रक म्हणाले, की दामले यांचा विरोध चुकीचा आहे. महापालिकेने नवीन २० वॉर्डनच्या नेमणुकीस मंजुरी द्यावी. त्यात विलंब करू नये. नवीन वॉर्डन डोंबिवली पश्चिमेत नेमावेत, अशी आग्रही मागणी केली. दामले यांना कोंडीचा त्रास होत नसल्याने त्यांचा या विषयाला विरोध असू शकतो, याकडे धात्रक यांनी लक्ष वेधले.
दोन भाजप सदस्यांमधील वाद पाहता आयुक्त गोविंद बोडके यांनी स्पष्टीकरण केले की, महापालिका हद्दीतील कोंडी दूर करण्यासाठी २० अतिरिक्त वॉर्डन नेमावेत, अशी मागणी वाहतूक नियंत्रण शाखेने केली आहे. वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर असल्याने या विषयाला स्थगिती देता येणार नाही. महापालिकेकडून वॉर्डन मिळत नसल्याने वाहतूककोंडीचे कारण वाहतूक शाखेकडून सांगितले जाते. त्यामुळे हा विषय मंजूर करणे गरजेचे आहे.
यावेळी प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सांगितले की, महापालिका हद्दीत १२ वॉर्डन नेमण्यासाठी वर्षाला १२ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. एका वॉर्डनला पाच हजार रुपये मानधन दिले जाते. २० वॉर्डन नेमल्यास त्यांच्या मानधनापोटी वर्षाला १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तो महापालिकेस करावा लागणार आहे. यापूर्वी महापालिकेने ७५ वॉर्डन नेमले आहेत. त्यात आणखी २० वॉर्डनची भर पडणार आहे. त्यामुळे नव्याने वॉर्डनची संख्या ९५ होणार आहे. वाहतूक शाखेकडे पोलीस बळाची कमतरता आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वॉर्डनची मदत घेतली जाते.
>पुढील महासभेत अहवाल सादर करा
दामले यांचा विरोध पाहता महापौर विनीता राणे यांनी सांगितले की, विषयाचे गांभीर्य पाहता हा विषय मंजूर केला जात आहे. मात्र, पुढील महासभेत प्रशासनाने यापूर्वी नेमलेले ७५ वॉर्डन कुठे नेमलेले आहेत. ते काय करतात, याचा तपशिलासह अहवाल सादर करावा, असे सूचित केले आहे.

Web Title: Traffic Control Branch will get 5 more wardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.