वाहतूक विस्कळीत ! २७ गावांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:26 AM2019-01-09T04:26:56+5:302019-01-09T04:27:18+5:30
वाहतूक विस्कळीत : राज्य सरकारच्या निषेधार्थ पिसवली येथे रास्ता रोको
कल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळावीत, त्यांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिसवली येथे टाटा नाका चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत कल्याण-शीळ मार्गावर पाच ते सात मिनिटे रास्ता रोको करण्यात आला. परंतु, यावेळी मानपाडा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्याचा फटका वाहनांना बसल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करा, बंद असणारे रजिस्ट्रेशन तत्काळ सुरू करावे, २७ गावे वगळण्याबाबतची अधिसूचना ७ सप्टेंबर २०१५ ला जाहीर होऊनही त्याची अंमलबजावणी का झाली नाही, यांसह अन्य मागण्यांकडे सरकारच्या होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे आंदोलन छेडण्यात आले. आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे, डॉ. वंडार पाटील, महेश तपासे, अर्जुनबुवा चौधरी, पारसनाथ तिवारी, रमेश हनुमंते, सुधीर पाटील, उमेश बोरगावकर, वल्ली राजन, राजेश शिंदे, गुलाब वझे, बाबाजी पाटील, दत्तात्रय वझे, जानु वाघमारे, प्रल्हाद भिल्लारे, सारिका गायकवाड यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. टाटा नाका चौकात प्रारंभी भाजपा-शिवसेना सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली. ‘नागपूरचा पोपट काय म्हणतो, ग्रामीणला न्याय नाय म्हणतो,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्याविरोधात नारेबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. परंतु, पोलिसांसमोरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत ठिय्या मांडला. मार्ग रोखताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार प्रवीण पाटील यांना निवेदन दिले. दरम्यान, मानपाडा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
आंदोलकांनाही बसला फटका : आधीच पत्रीपुलाच्या कोंडीमुळे वाहने संथगतीने जात असताना या रास्ता रोकोमुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली. आंदोलनकर्त्यांना पाच ते सात मिनिटांत बाजूला करण्यात आले. परंतु, बाजूला केलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण रोडकडील वाहतूक रोखून धरल्याने एकूणच वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा फटका कल्याणहून येणाऱ्या काही आंदोलकांनाही बसला. आंदोलनस्थळी ते उशिराने दाखल झाले.